Walmik Karad : वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये चाललंय तरी काय? आधी कैद्याकडे गांजा सापडल्याने खळबळ, अन् आता...
Walmik Karad : सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात पुन्हा एखादा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Walmik Karad : मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा कारागृह (Beed Jail) सतत चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत आहेत. वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप झाल्यामुळे हे कारागृह राज्यभर चर्चेत आले होते. काही महिन्यांपूर्वीच कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यात तुरुंगातच झालेल्या गँगवॉरमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर याच कारागृहात एका कैद्याकडे गांजा आढळला होता. यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृह चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या बीडच्या जिल्हा कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळलाय. याप्रकरणी कैद्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रफिक खुर्शीद सय्यद असे मोबाईल आढळून आलेल्या कैद्याचे नाव असून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील तो आरोपी आहे. कारागृहात त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने कारागृह प्रशासनाने त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे विना सिम कार्डचा एक मोबाईल आढळून आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
याआधी कैद्याकडे आढळला होता गांजा
काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कारागृहात गांजा आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे कर्तव्यावर असताना, बराक क्रमांक 7 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यांनी गायकवाडची झडती घेतली असता, त्याच्या अंडरविअरमध्ये रबरी, फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला. त्या बॉलमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळला. त्यानंतर त्याच्या पँटच्या खिशातही झडती घेतली असता, हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्यांसह अंमली पदार्थसदृश मुद्देमाल सापडला. संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी अक्षय गायकवाडविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























