मित्रासोबत बोलते म्हणून अल्पवयीन मुलीची प्रियकराकडून विहिरीत ढकलून हत्या
मुलाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने अपघाती मृत्यूची नोंद आधी केली गेली होती. मात्र पोलिसांनी तपास सुरुच ठेवला. त्यानंतर प्रियकरानेच मुलीची हत्या केल्याचे तपासात उघड झालं.
वर्धा : संशय अनेक घटनांचं कारण ठरतो. दुसऱ्या मित्रासोबत बोलते म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन अल्पवयीन मुलीची प्रियकराने विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना वर्ध्याच्या आर्वी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी सातत्याने कसून तपास करत या प्रकरणाचा घटनेनंतर चार ते पाच दिवसांत छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांना मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अजय उर्फ गोलू गंगाधर आत्राम (वय 24) असं आहे. अजय आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते. बुधवारी 23 जून रोजी रात्रीच्या सुमारास प्रियकराने भेटायला बोलावले होते. याचदरम्यान दुसऱ्या मित्रासोबत बोलण्याच्या कारणावरुन संशय घेत त्यांच्यात वाद झाला. दोघेही लगतच्या शेतातील विहिरीजवळ पोहोचले. तेथे वाद विकोपाला गेला आणि प्रियकराने मुलीला विहिरीत ढकलून दिले. आरोपी अजनने पोलिसांसमोर हे कबूल केलं आहे.
रात्री मुलगी न दिसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. मुलगी मिळाली नाही, मात्र तिची ओढणी विहिरीजवळ दिसून आला. यामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात होता. मृत्यूचे कारण कळून न आल्याने पोलिसांनीसुध्दा अपघाती मृत्यू दाखल केला. मात्र तपास सुरूच ठेवला. चार ते पाच दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अजयला अटक केली.
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाल पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनूने, सहाय्यक फौजदार भगवान बावणे, पोलिस हवालदार रणजित जाधव, अतुल भोयर, अनील वैद्य, अंकुश निचत, भुषण निघोट, चंद्रशेखर वाढवे, राजु राऊत, सतिश नंदागवळी, प्रदीप दातारकर, मनोज भोमले, पांडुरंग फुगनेर यांनी ही कारवाई केली.
असा लागला छडा
मुलीने आत्महत्या केली असावी यावर ठाणेदार संजय गायकवाड यांचा विश्वास बसला नाही. कोणतेही धागेदोरे नसताना प्रकरणाचा शोध सुरू केला. मुलीच्या दप्तराची तपासणी केली. यात मोबाईल नंबर लिहिलेल्या लहान चिठ्ठ्या दिसल्या. यातील एका चिठ्ठीवरील एक मोबईल नंबर दिसत नव्हता. तांत्रिक माहिती घेऊन तपास केला असता तो नंबर अजयचा निघाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि प्रकरणाचा छडा लावला.