Mumbai Rain : पुढचे पाच दिवस समुद्राला मोठं उधाण येणार, साडे चार मीटरपेक्षा मोठ्या लाटा उसळणार, समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना
Mumbai High Tide : समुद्राला मोठी भरती येणार असून पाच दिवस समुद्रकिनारी जाऊ नये अशी सूचना मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे.

मुंबई : पुढचे पाच दिवस म्हणजे 24 जून ते 28 जून या दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दरम्यान समुद्राच्या लाटा या साडे चार मीटरपेक्षा जास्त उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नयेत अशा सूचना मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आल्या आहेत. पुढच्या दोन ते तीन दिवसात मुंबईत पावसाच्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीदरम्यान समुद्राला येणारी ही 19 वी मोठी भरती असणार आहे. मोठी भरती याचा अर्थ सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना
या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दिनांक 26 जून 2025 रोजी उसळणार आहेत.
मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याच्या नजीक जावू नये. तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे.
लहान होड्यानी समुद्रात जाऊ नये
कोकण किनारपट्टीला 25 जून रात्रीपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलं आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह ठाण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासह पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर फारसा पाऊस पडला नाही. पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईच्या पाण्याची चिंता मिटली
सतत पडणाऱ्या पावसामउळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सातही धरणात मिळून 26.84 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेची जून महिन्यातील पाण्याची चिंता मिटली.
ही बातमी वाचा:




















