Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, फूड मॉलसाठी निविदा मागवल्या
Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.
Mumbai-Nagpur Expressway (Samruddhi Mahamarg) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. वारंवार होत असलेल्या अपघातामुळे सर्वसामान्य आणि विरोधकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सरकारने उपाययोजना कराव्यात या मागणीने जोर धरला होता. राज्य सरकारने अपघात कमी व्हावेत, त्यासाठी पाऊल उचलले आहे. समृद्धी महामार्गावर थांबा घेण्यासाठी ठिकाण नसल्यामुळे अपघात होत असल्याचा सूर होता. यावर आता सरकारने समृद्धी महामार्गावर रस्त्यालगतच्या सोयी सुविधा (वे-साईड सुविधा) देण्याचं आज टेंडर काढले आहे.
समृद्धीवर महामार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला. मात्र हा महामार्ग अपघातांच्या मालिकेने चर्चेत आला आहे. इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्यानंतर गाडी बंद झाल्याने ही अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर एवढा लांब प्रवास करताना रस्त्यालगच्या सोयी सुविधा नसल्यामुळे अपघात होत असल्याचा अनेकजणांचा आरोप होता. याआधीही यासंदर्भात टेंडर काढण्यात आलं होतं, त्यानंतर तीन वेळा या टेंडरला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या मुदतवाढीतही एकच कंपनी सहभागी झाल्यामुळे हे टेंडर नाकारल्याचं एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली होती. राज्य सरकारकडून आज पुन्हा टेंडर काढण्यात आलेय.
संपूर्ण समृद्धी महामार्गावर रस्त्यालगतच्या सुविधा( वे-साईड सुविधा) 16 ठिकाणी असणार आहेत. नागपूरच्या दिशेने जाताना आठ ठिकाणी आणि मुंबईच्या दिशेने येताना आठ ठिकाणी असे एकूण 16 फुडमॉल असणार आहेत. याबाबतचे टेंडर सरकारकडून काढण्यात आलेय. प्रत्येक फुड मॉलची अंदाजीत रक्कम ५० कोटी रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा टेंडर काढल्यानंतर आता किती कंपन्या सहभागी होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सरकारने समृद्धी महामार्ग ज्या गतीने पूर्ण केला त्याच गतीने सोयी सुविधा का उपलब्ध होत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तातडीने प्रभावी उपाययोजना करा, रामदास तडस यांच्या सूचना
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. समृध्दी महामार्गावर शंभर किलोमीटर अंतरावर वाहनास थांब्याची संधी द्यायला हवी. राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांची मद्यपान करून आहे किंवा नाही याबाबत चाचणी करायला हवी. वेग नियंत्रणात ठेवावा. प्रवासात सोबत ओळखपत्र असायला हवे, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी दिल्या आहेत. संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार रामदास तडस यांनी याबाबतच्या सूचना दिल्यात..