Mhada Lottery: कर्ज मिळत नसल्याने भाजप आमदाराला म्हाडाचं साडेसात कोटीचं घर सोडावं लागलं
Mhada Lottery : म्हाडाला भरण्यासाठी पैसे नसल्याने भाजप आमदार नारायण कुचे यांनी साडेसात कोटींचं घर घेण्यास नकार दिला आहे.
औरंगाबाद : जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांचे मुंबईत आलिशान घर घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील घर म्हाडाच्या लॉटरीत (Mhada Lottery) कुचे यांना साडेसात कोटीत मिळाले होते. या घराची अंदाजे किंमत दहा कोटीची होती. दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर होते. विशेष म्हणजे हेच घर कुचे यांना म्हाडाच्या लॉटरीत लागले होते. पण आता हे आलिशान घर आमदार नारायण कुचे यांनी सोडलं आहे.
मुंबईच्या म्हाडाच्या 4082 घरांची सोडत करण्यात आली. ज्यात सर्वात महागड्या म्हणजेच ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी काही राजकीय नेत्यांनी लोकप्रतिनिधी राखीव गटातून अर्ज केले होते. दरम्यान, नारायण कुचे यांना मुंबईत घर घ्यायचे होते, त्यासाठी त्यांनी देखील घरासाठी पाच अर्ज दाखल केले होते. या घरासाठी त्यांनी सर्वसाधारण व लोकप्रतिनिधी गटातून अर्ज दाखल केले होते.
विशेष म्हणजे, कुचे यांनी क्रीसेंट टॉवरमधील 7 कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपये किंमतीच्या घरासाठी 2 अर्ज केले होते. दरम्यान, याची सोडत झाल्यावर आमदार नारायण कुचे यांची लॉटरी लागली आणि त्यांना क्रीसेंट टॉवरमधील सर्वात महाग घर मिळाले. तब्बल दीड हजार स्क्वेअर फुटाचे साडेसात कोटींचे हे घर आहे. पण लॉटरी लागल्यावर सुद्धा कुचे यांनी हे घर सोडले आहे. पुरेसे कर्ज मिळत नसल्याने कुचे यांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भागवत कराड यांच्यासाठी कुचे यांनी घर सोडले असल्याची चर्चा होती. मात्र, भागवत कराडांसाठी नाही तर आर्थिक परिस्थिती कर्ज घेण्यासारखी नसल्याने घर सोडल्याची माहिती कुचे यांनी दिली आहे. तसेच मला दोन घर लागली होती, पण मी ते दोनही घरे सोडली असल्याचं कुचे म्हणाले आहेत.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांची लॉटरी लागणार?
ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांसोबतच, आमदार नारायण कुचे यांच्याकडून देखील क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरासाठी अर्ज केला होता. पण कुचे यांना लॉटरी लागल्याने घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हाडाच्या यादीत वेटिंगवर होते. पण आता आमदार कुचे यांनी घर घेण्यास नकार दिला असल्याने कराड यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
भागवत कराड आणि नारायण कुचे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा म्हाडाच्या घरासाठी अर्ज केले आहे. ज्यात माजी आमदार हिरामण वरखड यांनी तीन अर्ज केले होते, ते सर्व अर्ज अल्प उत्पन्न गटातील घरासाठी होते. तसेच आमदार आमश्या पाडवी यांनीही अल्प गटातील घरासाठी अर्ज केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Mhada: दहा कोटीचे घर सात कोटींमध्ये, भाजप आमदाराला म्हाडाची लॉटरी; दक्षिण मुंबईत आलिशान घर