मुंबईत राष्ट्रवादी महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार? निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
राज्यात महापालिकेच्या निवडणुकांची (Municipal Corporation Election 2026) घोषणा झाली आहे. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Mumbai Mahapalika Election NCP News : राज्यात महापालिकेच्या निवडणुकांची (Municipal Corporation Election 2026) घोषणा झाली आहे. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुती सोबत आणि महायुती शिवाय लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईत किमान 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण
मुंबईत किमान 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. महायुतीत राहायचे की नाही हा निर्णय अजित पवार घेणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आता निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. 29 महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे.
23 डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार
अर्ज स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर, अर्जाची छाननी 31 डिसेंबर, उमेदवारी माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी, मतदान दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणी 16 जानेवारी 2026 दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होता, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणीही करण्यात येत होती, मात्र आता राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी घेतली अमित शाहांची भेट
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात जिथे युती करणे शक्य असेल तिथे युती करा, अशी अमित शाह यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना सूचना दिल्या आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गेल्यास अमित शाह यांना काहीच हरकत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वासोबत बोलण्याचं देखील आश्वासन देखील अमित शाह यांनी यावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंना दिलं. अमित शाहांच्या या भेटीनंतर उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या:
Praful Patel Sunil Tatkare Amit Shah Meet: शरद पवारांसोबत युती केल्यास काहीच हरकत नाही; अमित शाह प्रफुल पटेल अन् सुनील तटकरेंना काय काय म्हणाले?























