ST Bus News: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून लालपरी धावणार नाही; एसटीने का घेतला हा निर्णय, जाणून घ्या
MSRTC Bus News: मुंबई-पुणे जुन्या महामार्गाऐवजी एक्स्प्रेसवे वरून एसटी बस चालवणाऱ्या एसटी चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
ST Bus Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून (Mumbai Pune Expressway) आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस (ST Bus) धावणार नाहीत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून फक्त शिवनेरी बस (Shivneri Bus) चालवण्यात येणार आहे. एसटीच्या अनेक साध्या बसेस एक्स्प्रेसवेवरून जात असल्याने त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला (MSRTC) बसत आहे. प्रवासी भारमान कमी होणे आणि टोलचा भार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत होता. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून एसटी बसेस धावत नसल्याने जवळपास 30 ते 50 टक्के प्रवासी भारमान घटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, आता एसटीच्या साध्या बस या जुन्या मार्गावरून चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवनेरी वगळता इतर एसटी बसने एक्स्प्रेसवेवरून प्रवास केल्यास त्या दरम्यान ई-टॅगमधून वळती करण्यात आलेली अधिकच्या फरकाची रक्कम चालकाकडून वसूल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्याशिवाय, अशा चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीदेखील, एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवली जात होती. मात्र, काही चालक परस्परपणे एक्स्प्रेसवरून एसटी चालवत असे. ही बाब उघडकीस आल्यानंतर एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे.
पूर्वी जुन्या मार्गे सर्व एसटी बसेस धावायच्या. मेगा हायवे झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या त्या मार्गे धावू लागल्या. शिवनेरी वगळता इतर बसेसही एक्स्प्रेसवेवरून धावू लागल्या होत्या. काही चालकांनी परस्परपणे प्रशासनाने नेमून दिलेला मार्ग सोडून एक्स्प्रेसवे वरून वाहतूक सुरू केली होती. यामुळे प्रवासी भारमान कमी झाले. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरही झाला. त्यामुळे एसटी महामंडळाने बेशिस्त एसटी चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बेंगळुरू, मंगलोर मार्गाकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस आता जुन्या मुंबई-पुणे मार्गे धावणार आहेत.
टोलचा अधिकचा भार
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर एका बसला 485 रुपये टोल (जात-येता) द्यावा लागतो. तर नवीन एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी त्याच बसला रुपये 675 टोल(जाता-येता ) द्यावा लागतो. एका बसमागे एका फेरीमागे 190 रुपयांचा भुर्दंड पडतो.
प्रवासी भारमान घटले
नवीन एक्सप्रेसवे वरून जाताना पनवेल ते पुणे या तब्बल 130 किलोमीटर अंतरावर एकही प्रवासी चढउतार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या तुलनेत जुन्या हायवे वरून जाताना खोपोली, लोणावळा, तळेगाव या ठिकाणी प्रवासी भारमान अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने जुन्या मार्गावरून एक्स्प्रेस वेवरून एसटी बस चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोणावळा येथे शनिवार- रविवार मोठ्या संख्येने प्रवासी आणि पर्यटक जात असतात. शिवाय इतर दिवशी देखील मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक प्रवास करत असतात. मात्र परस्पर एक्स्प्रेसवे वरून वाहतूक करणाऱ्या एसटीच्या बसेसमुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनांनी जावे लागते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर फक्त या बसेस धावणार
एसटी महामंडळाच्या शिवनेरीसह मुंबई-सातारा, बोरिवली-सातारा या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेस सह अन्य बसेस मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून पूर्वीप्रमाणेच धावणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: