ST Bus News : सरकारच्या घोषणेनंतर तिकिट दरात 50 टक्के सवलत का नाही? एसटीच्या वाहकाला मारहाण, वादावादीने कर्मचारी त्रस्त
ST Bus News : एसटी महिला प्रवाशांना जाहीर झालेल्या तिकिट दराच्या सवलतीवरून एसटी वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये वाद होत आहेत. रेणापूरमध्ये एका बस वाहकाला मारहाणदेखील झाली आहे.
ST Bus News : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे सध्या एसटी कर्मचारी त्रस्त असून अनेक ठिकाणी महिला प्रवाशांसोबत वादावादी सुरू असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते. राज्याच्या ग्रामीण भागात एसटी बसचा अनेकांना आधार असतो. ग्रामीण भागातील अनेकजण आजही एसटीवर अवलंबून आहेत. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या घोषणेची माहिती समाजमाध्यमांद्वारे ही लोकांपर्यंत पोहचली आहे. एसटीमध्ये महिला प्रवाशांना तिकिट दरात 50 टक्के सवलतीची मागणी आता होऊ लागली आहे. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात एसटी वाहकांसोबत महिला प्रवासी आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिला नातेवाईकांचे खटके उडत आहेत. या प्रकारामुळे एसटी कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
रेणापूरमध्ये एसटी वाहकाला मारहाण
शासनाने घोषित केल्याप्रमाणे महिलांना तिकीटामध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी महिला एसटी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही ठिकाणी वादाचे रुपांतर भांडणात होऊ लागली असल्याने एसटी कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका वाहकाला महिला प्रवाशीच्या नातेवाईकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एसटी वाहक जखमी झाले असून रक्तबंबाळ झाले आहेत. पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
शासनाने जीआर काढावा; एसटी कर्मचारी संघटनेची मागणी
एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतू, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नाही. एसटीमधून प्रवास करणार्या ग्रामीण भागातील महिला प्रवाशांकडून एसटी वाहकांकडून अशा पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांकडून मारहाण केली जात आहे. त्यामुळे जीआर न काढल्यामुळे एसटी कर्मचार्यांना ग्रामीण भागांमधे ड्यूटी करणे जिकीरीचे झाले असल्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.