आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरची प्रशासनाकडून थट्टा, मुलाखतीच्या उमेदवारांच्या यादीत स्वप्नीलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखत होत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणानं 29 जूनला आत्महत्या केली होती.
पुणे : मृत स्वप्निल लोणकरचं नाव एमपीएससीकडून मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखत होत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणानं 29 जूनला आत्महत्या केली होती. या घटनेला 6 महिने उलटल्यानंतरही मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत मृत स्वप्निलचं नाव देण्यात आलंय. स्वप्निलला 7 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजता मुलाखतीसाठी बोलवण्यात आलंय. आज हयात असता तर पीएसआय अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं.
आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं. स्वप्नीलने 2019 आणि 2020 मध्ये झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवलं होतं. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही. 2021 मध्ये झालेली एम पी एस सी ची प्राथमिक परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. स्वप्नील लोणकर हा मुळचा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून तो कुटुंबांसह पुण्यात राहत होता. स्वप्नीलचे वडिल पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक छापण्याचा व्यवसाय करतात तर स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर स्वप्नील एम पी एस सी परीक्षेची तयारी करत होता.
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येने राज्यातील तरुणाईभोवती पसरलेलं एमपीएससीचं मायाजाल किती जीवघेणं बनलंय हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. खासकरून ग्रामीण भागातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवून अधिकारी बनवण्याच स्वप्न ज्या एमपीएससीमुळे पडतं त्या एमपीएससीची निवड प्रक्रिया कमालीच वेळखाऊ आणि तेवढीच असंवेदनशील बनल्याने लाखो तरुणांची उमेदीची वर्षं एमपीएससीच्या मृगजळामागे लागल्याने वाया जात आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा फैसला करणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार दोनच व्यक्ती पाहत असून सदस्यांची चार पदं मागील दोन वर्षांपासून भरण्यातच आलेली नाहीत. एमपीएससीचा हा ढिसाळपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय.
महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानं तर नंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.
इतर बातम्या
- Ola Scooter : ओला स्कूटर डिलिव्हरीसाठी सज्ज! जाणून घ्या किंमत आणि मायलेज!
- Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
- New MG Motor EV : MG Motor बाजारात आणणार नवी SUV