MPSC Result : दु:खाचा डोंगर कोसळला तरीही हरली नाही; आईचं स्वप्न साकार करत कोल्हापूरच्या धनश्रीची PSI पदाला गवसणी
PSI Result : कोल्हापूरच्या धनश्री तोरस्करने PSI परीक्षेत स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात पाचवी येण्याची किमया केली आहे. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय.
कोल्हापूर: आयुष्यात कितीही संकटं येऊ देत, आपण जिद्दीने त्याचा सामना केल्यास यश हे आपलंच असतं. हीच गोष्ट कोल्हापूरच्या धनश्री तोरस्करने सिद्ध करून दाखवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत तिने स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आणि तिच्या दिवंगत आईचं स्वप्न साकार केलं. धनश्रीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये तसेच परिसरात समाधान व्यक्त केलं जातं आहे.
धनश्री विठ्ठल तोरस्कर ही कोल्हापुरातील बापट कॅम्प मधील रहिवासी आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमधून झालं. त्यानंतर इंग्रजी या विषयातून तिने कमला कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर तिने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. धनश्री ही कोल्हापुरातील रग्बीची पहिलीच राष्ट्रीय खेळाडू आहे.
समांतर आरक्षणामुळे संधी हुकली
धनश्रीने 2013-14 सालापासून पीएसआयचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात ती पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली. पण दुर्दैवाने समांतर आरक्षणामुळे नंतर निकाल बदलला आणि अंतिम यादीतून तिचे नाव वगळण्यात आले.
तिसऱ्या प्रयत्नात यश
पहिल्यांदाच एवढा मोठा धक्का बसल्यानंतर धनश्री खचली नाही. तिने पुन्हा नव्याने जोमाने तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात तिला अपयश आले. तरीही जिद्द न सोडता तिने तयारी सुरू ठेवली. तिसऱ्या प्रयत्नात मात्र धनश्रीने बाजी मारली.
आईचे स्वप्न साकार केलं पण....
धनश्री ही जिम ट्रेनर म्हणून काम करते. पण आपल्या पोरीनं पीएसआय व्हावं ही धनश्रीच्या आईची इच्छा. आईच्या इच्छेखातर धनश्रीने अभ्यास सुरू केला. दोन वेळा अपयश आल्यानंतरही ती खचली नाही. 2019 च्या मुख्य परीक्षेच्या एक महिना आधी धनश्रीच्या आईचे निधन झालं. हा धनश्रीसाठी मोठा आघात होता. मग आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी धनश्रीने कंबर कसली. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही धनश्रीने मोठ्या हिमतीने अभ्यास केला आणि हे यश मिळवलं.
आईचं स्वप्न साकार करू शकल्याचं समाधान आहे असं धनश्रीने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. कोणतेही ध्येय ठरवलं तर त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करून काम केल्यास यश हे नक्की मिळतं असंही ती म्हणाली.
धनश्रीच्या या यशात तिची दिवंगत आई मनीषा तोरस्कर, वडील विठ्ठल तोरस्कर, भाऊ राहुल तोरस्कर, बहिण पूनम मोहिते तसेच मामा संजय घाटगे यांचे मोलाचं सहकार्य लाभलं. अभ्यासासाठी जमीर मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभलं. शारीरिक चाचणीसाठी तिला क्रीडा मार्गदर्शक सुभाष पवार आणि दिग्विजय मळगे तसेच कोल्हापूर रग्बी असोसिएशनचे सचिव दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
संबंधित बातम्या:
- Success Story : चहावाल्याच्या मुलीचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण! MPSC परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी
- PSI Result : नोकरी सोडली आणि धाडस केलं, अखेर बिकट परिस्थितीवर मात करत फौजदार झाला.., औरंगाबादच्या योगेश नाल्टेची कहाणी
- MPSC Result : बारामतीच्या शुभम शिंदेची कमाल; मोलमजुरी करणाऱ्याच्या मुलाने घातली PSI पदाला गवसणी