संजय राऊतानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य; एखाद्या वेळेस काँग्रेस सांगली महापालिका स्वतंत्र लढेल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना स्थानिक पदाधिकारी यांच्या भावना ओळखून आघाड्या कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं.
Vishal Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना स्थानिक पदाधिकारी यांच्या भावना ओळखून आघाड्या कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं. इंडिया आघाडी ही दिल्लीत तयार झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आघाडी राहिलं मात्र, एखाद्या महापालिका निवडणुकीत आघाडी होईलच असं नाही. एखाद्या वेळेस सांगली महापालिका स्वतंत्र लढेल, स्थानिक भावना ओळखून हा निर्णय घ्यावा लागतो असं मोठं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं आहे.
प्रत्येक स्तरावर आघाडी होईलच असं नाही
पवारसाहेब चुकीचं काही बोलले नाहीत. इंडिया आघाडीत त्यांची भूमिका महत्वाची असल्याचे विशाल पाटील म्हणाले. भाजपचा पराभव हा मुख्य हेतू होता. त्याला यश देखील आलं आहे. पण थोडक्यात राहिलं. विधानसभेनंतर प्रत्येक पक्षाला इतर निवडणुकीबाबत महत्वकांशा असणं स्वाभाविक आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांची मतं लक्षात घेता प्रत्येक स्तरावर आघाडी होईलच असं नाही. सांगलीतील बंडखोरी काही कारणांवरुन झाली. लोकसभेत त्याचा फायदा झाला. मात्र विधानसभेत त्याची पुर्नरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा असताना, मला नाईलाजाने आम्ही एका ठिकाणी तो प्रयोग केला विधानसभेला नुकसान झाल्याचे विशाल पाटील म्हणाले.
पुरोगामी महाराष्ट्रासाठी आम्हा सर्वांना एकत्र काम करावं लागेल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना स्थानिक पदाधिकारी यांच्या भावना ओळखून आघाड्या कराव्या लागणार आहेत असंही ते म्हणाले. एखाद्या महापालिका निवडणुकीत आघाडी होईलच असं नाही. एखाद्या वेळेस सांगली महापालिका स्वतंत्र लढेल, स्थानिक भावना ओळखून हा निर्णय घ्यावा लागतो असे पाटील म्हणाले. मात्र, वरिष्ठ स्तरावर आघाडी कायम राहिल असेही ते म्हणाले. विधानसभेचा पराभव ज्या पद्धतीने झाला त्यामुळं आम्ही सर्व डिस्टर्ब आहेोत. काही नेते वैयक्तिक भावना मांडत असतील ती पक्षाची मते नसतील. हा पराभव संयुक्तीक आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी आम्हा सर्वांना एकत्र काम करावं लागणारचं आहे.