नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला?
भाजपमध्ये मराराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करणार असल्याचे संकेत याआधी राणेंनी दिले आहेत. त्यामुळे पक्षप्रवेशाबरोबरच 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष'ही भाजपमध्ये विलीन करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नारायण राणेंचा अधिकृत भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
येत्या 2 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता गरवारे क्लब येथे नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश आणि नितेशही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे संकेत याआधी राणेंनी दिले आहेत. त्यामुळे पक्षप्रवेशाबरोबरच 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष'ही भाजपमध्ये विलीन करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पारंपरिक शत्रू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेला विश्वासात घेऊन हा पक्षप्रवेश व्हावा यासाठी एवढे दिवस नारायण राणेंचा भाजप प्रवेश लांबला होता. मात्र शिवसेनेचा विरोध मावळल्याने नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत.
राणे कुठल्या पक्षात जातात, शिवसेनेला फरक पडत नाही
राणे कुठल्या पक्षात जातात, काय भूमिका घेतात याचा शिवसेनेला फरक पडत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल. यापुढे मतदारसंघात नारायण राणेंना सहकार्य करण्यासंदर्भातील निर्णय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर घेऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या