स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुकलेत कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कोल्हापुरातील चार प्रतिथयश शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार
चार शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना असोसिएशनच्या माध्यमातून स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुकला क्षेत्रातील प्रत्यक्ष कामांचा अनुभव घेता येणार आहे. असोसिएशनच्या माध्यमातून व्यापक समाजहित लक्षात घेऊन राबवण्यात येणार्या उपक्रमांसाठी या संस्थांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभणार आहे.

कोल्हापूर : अभियंता आणि वास्तुविशारदांच्या उत्कर्षासाठी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनियर्स कोल्हापूर ही संस्था काम करते. या संस्थेने सभासदांच्या विकासा बरोबरच सामाजिक उत्तरदायित्व जपत कोल्हापूरच्या विविध प्रश्नांना सोडवण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले आहे. असोसिएशनने आता काळानुसार बदलत जाणारी अभियांत्रिकी आणि वास्तुकला क्षेत्राची गरज ओळखून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी पुढाकार घेतलाय. असोसिएशनने केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय, डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, न्यू पॉलिटेक्नीक व शासकीय तंत्रनिकेतन यांच्याशी सामंजस्य करार केले आहेत.
असोसिएशनचा वर्धापनदिन, अभियंता दिन आणि जागतिक आर्किटेक्चर दिन यांचे औचित्य साधत असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. केआयटीचे प्राचार्य डॉ. विलास कार्जिण्णी, डीवायपी ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, न्यू पॉलिटेक्नीकचे प्राचार्य विनय शिंदे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार आणि असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या. या करारांद्वारे असोसिएशन आणि या संस्था यांच्यामध्ये माहिती आणि ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या चार शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना असोसिएशनच्या माध्यमातून स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुकला क्षेत्रातील प्रत्यक्ष कामांचा अनुभव घेता येणार आहे. असोसिएशनच्या माध्यमातून व्यापक समाजहित लक्षात घेऊन राबवण्यात येणार्या उपक्रमांसाठी या संस्थांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. विलास कार्जिण्णी यांनी पुस्तकी ज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज याच्यातील तफावत दूर करण्यासाठी हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार असून यातून उद्योगांची गरज पूर्ण करणारे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, आतापर्यंत शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यामधील कुशल मनुष्यबळावरुन निर्माण होणारा विसंवाद संपवण्यासाठी असोसिएशनने या सामंजस्य करारांच्या माध्यमातून घेतलेला पुढाकार स्वागतार्ह असल्याचे सांगितले.
प्राचार्य विनय शिंदे व प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी असोसिएशन आणि शैक्षणिक संस्थांच्या परस्पर सहकार्यातून विद्यार्थ्यांना शिकत असतानाच प्रात्यक्षिक ज्ञान मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागेल असे सांगितले. असोसिएशनचे ज्येष्ठ सभासद रवींद्र फडणीस यांनी १९७४ पासूनचे डीएसआर तर बलराम महाजन यांनी १९७० पासूनचे एनबीसी असोसिएशनच्या ग्रंथालयासाठी अध्यक्ष अजय कोराणे यांच्याकडे सुपूर्द केले.
























