काळाच्या जबड्यातून वाचवले लेकीचे प्राण; पोटच्या गोळ्यासाठी आईची वाघाशी झुंज
चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या बाजूला असलेल्या जुनोना गावातील अर्चना मेश्राम यांनी आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून वाचवून आणलंय.
चंद्रपूर : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण काही उगाच नाही कारण तुमच्यासाठी आई जे करू शकते ते जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीही व्यक्ती करू शकत नाही याची प्रचितीच चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या बाजूला असलेल्या जुनोना गावातील अर्चना मेश्राम यांनी दिली आहे. आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून या मातेनं वाचवून आणलंय.
सडपातळ बांधा असणारी वयाची तिशी सुद्धा न गाठलेली ही जंगलानजीक राहणारी अर्चना मेश्राम. तिची पाच वर्षाची मुलगी प्राजक्ता, जिच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला नुसत्या इजाच नाही तर हाडंपण तुटली आहेत. जंगलानं वेढलेल्या या गावात राहणाऱ्या लोकांना अजूनही फारशी शौचाची सोय नाही आणि त्यामुळे वाघ, अस्वल यांना न जुमानता गावालगतचं जंगल गाठावं लागतं. असंच आईचा पाठलाग करत जंगलात गेलेल्या या चिमुकलीला चक्क एका मोठ्या वाघानं तोंडांत पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हते. या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी आईने धाडस करत बांबूच्या साहाय्याने मुलीला वाघाच्या तावडीतून सोडवले.
वाघाच्या जबड्यातून मुलगी सोडवल्यानंतर निपचित पडलेल्या मुलीला पाहून आई घाबरली. गेले 15 दिवस प्राजक्ता चंद्रपूरला दवाखान्यात दाखल होती आणि आता तिच्या जबड्याच्या फ्रॅक्चर्सच्या सर्जरीसाठी तिला नागपूरला आणले आहे.
जुनोना हे छोटसं गावं, तिथे जगणं सोपे नाही. सतत जंगलाशी सामना करावा लागतो. अर्चनाला दोन मुली असून पती संदीप हा रंगकाम करतो. आज आपल्या मुलीला उराशी बाळगून अर्चना मुलीची ट्रीटमेंट नागपूरला करायला आली आहे. आपल्या मुलीसाठी किती ही लढायला तयार आहे. खरचं वाघाला पळवून लावणारी ही आईच खरी वाघीण.
अन्नाच्या शोधात प्राणी शहरात, मानव-प्राणी संघर्षाचा नवा अध्याय?