पालघरमधून आणखी एक व्हिडीओ समोर; उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरवरही जमावाचा हल्ला करण्याचा प्रयत्न
पालघरमध्ये जमावाकडून तिघांची हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आलाय. गावात उपचार करण्यासाठी गेलेल्या एका डॉक्टरवरही असाच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.
मुंबई : पालघर जिल्ह्यात जमावाकडून तिघांची हत्या झाल्याची घटना 17 एप्रिलला घडली. गावात पसरलेल्या अफवेतून ही घटना घडल्याचे समोर आलं आहे. या घटनेची गंभीर दखल राज्यसरकारने घेतली आहे. ही घटना ताजी असतानाच पालघरमधून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या भागात जमावाने तिघांची हत्या केली त्याच गावातील हा व्हिडीओ आहे. काही दिवसांपूर्वी उपचार करण्यासाठी गावात गेलेल्या डॉक्टरवरी अशाच प्रकारे हल्ला झाला होता. हा डॉक्टर या जमावाच्या ताब्यातून थोडक्यात वाचला.
जमावाच्या हल्ल्यातून वाचलेले डॉक्टर विश्वास वल्वी या घटनेच्या दोन दिवस अगोदर या गावात उपचारासाठी गेले होते. मात्र, 200 पेक्षा अधिक जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या डॉक्टरांनी कसाबसा आपला जीव वाचवला. यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी या घटनेने ते भयभीत झाले आहे. गावात चोरी करण्याच्या उद्देशाने लोक शिरले असल्याची अफवा या लोकांमध्ये पसरली असल्याची माहिती विश्वास यांनी दिली. त्यामुळे घाबरलेले गावकरी येईल त्या व्यक्तीवर हल्ला करत सुटले आहेत.
पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोहचले. येथे चोर असल्याच्या संशयावरून जमावाना त्यांच्यावर हल्ला केला. यात तिघांचाही मृत्यू झाला. मॉब लिंचिंग घडलं ते गाव पालघरपासून 110 किमी अंतरावर आहे. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ हा प्रकार घडला. दोन साधू गुजरातला या दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली. पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली आहे. पालघर प्रकरणात 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
CM Uddhav Thackeray | पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : उद्धव ठाकरे