संभाजीराजेंना 'मनसे' पाठिंबा ! चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात, मनसेचा हल्लाबोल
संंभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघारी घेतल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुंबई : राज्यसभा निवडणूक अपक्ष लढवण्यासाठी ठाम असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याचा आरोप करत रिंगणातून माघार घेतली आहे. राजेंनी निवडणुकीतून माघारी घेतल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेनं फक्त संभाजीराजेंचा अपमान केला नाही, तर समस्त छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
संभाजीराजे यांनी माघार घेतल्यानंतर मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केल्याची टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, संभाजीराजेंना सर्व राजकीय पक्षांनी नाकारणे हे महाराष्ट्राच दुर्दैव आहे. संभाजीराजे यांना शिवसेनेचं राजकारण कळालं नाही. त्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही, त्यामुळे ही बाळासाहेबांची शिवसेना नाही हे पुन्हा एकदा उघड झाले. ज्यांच्या नावाचा द्वेष हे करतात त्यांच्याच वारसाचा आज अपमान झाला आहे हे पाहून वाईट वाटलं आणि या घटनेतून राजकारणातील कटूता पुन्हा एकदा दिसून आली आहे.
संभाजीराजेंना जागा द्यायला हवी होती
शिवाजी महाराजांना सुद्धा प्रस्थापित लोकांनी त्रास दिला होता, आणि तेच आता संभाजीराजेंच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मिळून संभाजीराजे यांना एक जागा द्यायला पाहिजे होती, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.
गजानन काळे यांचाही शिवसेनेवर हल्लाबोल
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सुद्धा राजेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर हल्ला चढवला.छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात "शिव" वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशी बोचरा वार गजानन काळे यांनी केला आहे.
महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये
गजानन काळे यांनी आणखी एक ट्विट करताना म्हटले आहे की, चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात.भावाबद्दल कूटनिती करणाऱ्यांकडून राजेंना फसवले म्हणून काय आश्चर्य वाटून घ्यायचे ? महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये.हिम्मत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ येवून सांगा की आम्ही राजेना शब्द दिला नव्हता.
संभाजीराजे माघार घेताना काय म्हणाले ?
संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून,स्वाभिमान आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील वाटचाल कशी असणार अशी चर्चा सुरु असताना मी दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यावेळी मी बोललो होतो की राज्यसभा निवडणूक लढवणार आहे.पुढील प्रवास किती खडतर आहे हे मला माहीत होते. मागील 15 ते 20 वर्षे मी काम करत आहे. खासदारकी असताना समाजाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी करत होतो. त्यामुळेच माझी इच्छा होती, की सर्व पक्षांनी मिळून मला राज्यसभेत पाठवावे. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की,शिवाजी महाराज यांचं स्मारक असेल तिथं आपण दोघांनी जायचं आणि संभाजीराजे खोटं बोलतायत का हे सांगायचं असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.
हे ही वाचलं का ?