Maharashtra MLC Election : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान, 5 मतदारसंघात तयारी पूर्ण
Maharashtra MLC Election : 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. तर, दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
MLC Election News : दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात उद्या (सोमवार, 30 जानेवारी 2023) मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक ,अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. तर, दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पाचही मतदारसंघातील लढती रंगतदार होणार आहेत. पण नाशिक मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत नाशिक मतदारसंघात नवनव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय नागपूर शिक्षक मतदारसंघाकडेही लक्ष लागलेय. नागपूर जिल्हयात या निवडणूकीसाठी 16 हजार 480 एवढी पात्र शिक्षक मतदार आहे. यासाठी जिल्हयात एकूण 43 मतदान केंद्र आहेत.
राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या निवडणुकांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील निवडणुकीचा इतिहास पहिला तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, नागपूर शिक्षक मतदारसंघात अपक्ष नागो गाणार, कोकण शिक्षक मतदार संघात अपक्ष बाळाराम पाटील, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे आणि अमरावती पदवीधर मतदार संघात भाजपचे रणजीत पाटील हे निवडून आले होते. या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. सोमवारी या पाचही जागांसाठी मतदार होणार आहे. निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे.
कोकण शिक्षक मतदार संघात काय स्थिती ?
कोकण शिक्षक मतदार संघात यंदा भाजप युती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये आमदार बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये बाजी कोण मारणार हे पहावे लागणार आहे. बाळाराम पाटील मागील निवडणुकीत विजयी झाले होते, त्यांना यंदा महाविकास आघाडीने पाठिंबा दिलाय. तर मागच्या खेपेला पराभूत झालेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना यावेळी भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय.
कोकण शिक्षक मतदार संघ
बाळाराम पाटील ( शेकाप)
ज्ञानेश्वर म्हात्रे ( भाजप)
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
विक्रम काळे ( राष्ट्रवादी)
किरण पाटील ( भाजप)
नाशिक पदवीधर
शुभांगी पाटील (अपक्ष)
सत्यजित तांबे (अपक्ष)
धनराज विसपुते (अपक्ष)
धनंजय जाधव (अपक्ष)
नागपूर शिक्षक
गंगाधर नाकाडे (मविआ - शिवसेना)
नागो गाणार ( भाजप पाठींबा)
अमरावती पदवीधर
धीरज लिंगाडे (मविआ - कॉग्रेस)
डॉ. रणजित पाटील ( भाजप उमेदवार)
अशी असते मतदान प्रक्रिया...
निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवार ना पसंती क्रम देता येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होतात. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषद स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी सभागृहाचे एकास तीन सदस्य निवृत्त होतात तेवढेच नव्याने निवडतात.