आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा, अमरावती न्यायालयाचा निर्णय
तहसीलदार राम लंके यांनी 27 फेब्रुवारी 2013 रोजी वरुड पोलिसात दाखल केल्यानंतर कलम 353, 183,294,506 अन्वये गुन्हा दाखल करत 15 एप्रिल 2013 रोजी दोषारोपपत्र सादर केले गेले.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना अर्वाच्च भाषेत आईवरून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्याची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. आज अमरावती न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना तीन कलमामध्ये दोष सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय दिला आहे.
वरुड येथे 2013 मध्ये सुवर्ण जयंती राजस्व अभियान याची यशोगाथा तयार करत असताना आमदार देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले. त्यानंतर तावातावाने जोरजोरात बोलू लागले की, ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे. माझा फोन का कट केला म्हणून ओरडले. अशी तक्रार तहसीलदार राम लंके यांनी 27 फेब्रुवारी 2013 रोजी वरुड पोलिसात दाखल केल्यानंतर कलम 353, 183,294,506 अन्वये गुन्हा दाखल करत 15 एप्रिल 2013 रोजी दोषारोपपत्र सादर केले गेले.
या प्रकरणात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरुद्ध कलम 353 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी कलम 353 भा.दं. वि. अन्वये तीन महिने सक्त मजुरी आणि 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. तसेच कलम 294 भा.दं. वि. अन्वये दोन महिने सक्त मजुरी आणि 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास. कलम 506 भा.दं. वि. अन्वये तीन महिने सक्त मजुरी आणि 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या तीनही शिक्षा एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. आणि रक्कम वसुल झाल्यानंतर रुपये 10 हजार नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी राम लंके यांना देण्याचा आदेश पारीत केला आहे.
शेतकऱ्यांसाठी वर्षभरात असे 365 गुन्हे दाखल केले तरी मान्य - आमदार देवेंद्र भुयार
जानेवारी 2013 मध्ये 2000 क्विंटल ज्वारी कृषि उत्पन्न बाजार समिती, वरुड येथे शेतकऱ्यांनी आणली होती. त्या कालावधीत अवकाळी पाऊस आला. त्यामुळे करजगाव येथील शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली. त्यामुळे वरुडचे तहसीलदार यांना सदर बाब लक्षात आणून दिली. परंतु ज्वारी मोजण्यास प्रशासकीय यंत्रणा तयार नव्हती. ज्वारीला पाण्यामुळे कोंबे फुटले होते. त्यामुळे त्यांना वारंवार लक्षात आणून दिले. परंतु प्रशासकीय यंत्रणा मान्य करत नव्हती. दोन दिवसानंतर सदर ज्वारी मोजली. या कारणामुळे माझ्यावर प्रशासकीय यंत्रणेनी तत्कालीन शासनाचे दबावाखाली माझा आवाज दाबण्यासाठी आणि माझे नेतृत्व दाबण्यासाठी षडयंत्र रचून गुन्हा दाखल केला होता. आज या प्रकरणात न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. विद्यमान न्यायालयाने दिलेला निर्णय मला मान्य आहे. परंतु अशा प्रकारचा दररोज एक गुन्हा दाखल केला वर्ष भरात असे 365 गुन्हे दाखल केले तरी मान्य आहे. मी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न करत राहीन. आता शासनात अशा प्रकारचे अधिकारी यांना वठणीवर आणण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.