Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह, लेटरहेडचा गैरवापर; राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह तसेच परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
![Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह, लेटरहेडचा गैरवापर; राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल Misuse of Shivaji University emblem letterhead case registered against an unknown person Kolhapur Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह, लेटरहेडचा गैरवापर; राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/2c909b46f59c7a7b5be82d5bc12bda231659699353_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह तसेच परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. जुलै 2022 पासून हा प्रकार सुरू असून, परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे विद्यापीठाची बदनामी आणि फसवणूक केल्याबद्दल डॉ. अजितसिंह जाधव यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, या प्रकारानंतर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा संदर्भात प्रसारित केलेल्या बातमीमध्ये फेरफार करून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न संशयिताने केला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. अजितसिंह एन. जाधव यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची नुकतीच भेट घेऊन शिवाजी विद्यापीठाची बदनामी आणि परीक्षाविषयक कामकाजाविषयी चुकीचा संदेश व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी या घटनेची दखल घेत राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे व सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाला या घटनेची चौकशी करून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व
दरम्यान, नुकत्याच झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने वर्चस्व राखले. पदवीधर गटात आघाडीचे दहापैकी सात जागांवर उमेदवार विजयी झाले; तर शिव-शाहू आघाडीच्या श्वेता परुळेकरने बाजी मारली. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) उमेदवार विद्या परिषदेच्या आठपैकी चार जागांवर निवडून आले, तर याआधी दोन जागांवर त्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. महाविद्यालयीन शिक्षक गटाच्या दहापैकी सहा जागांवर ‘सुटा’चे उमेदवार निवडून आले. त्यांचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दोन जागांवर विकास आघाडीने विजय मिळविला.
अधिसभेच्या 39, विद्या परिषद आठ व अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन सदस्य याप्रमाणे निवडणूक झाली. अधिसभेवर प्राचार्य गटाच्या दहा, संस्थाचालकांच्या सहा जागांवर विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. पदवीधरच्या दहा जागांपैकी दोन जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. या गटात आठ जागांसाठी निवडणूक होती. विद्या परिषदेच्या आठ जागांपैकी प्रत्येकी दोन जागांवर ‘सुटा’ व विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या गटात चार जागांसाठी निवडणूक झाली. महाविद्यालयीन शिक्षक गटातील दहापैकी दहा जागांसाठी निवडणूक होऊन दोन जागांवर विकास आघाडीने बाजी मारली; तर शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेने (सुप्टा) विद्यापीठ अधिविभाग शिक्षक गटातील तिन्ही जागा जिंकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)