Corona Vaccination : कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीण- आदिवासी भागात गैरसमज; जनजागृतीची नितांत गरज
ऑनलाईन लसीकरण नोंदणी करण्यास ग्रामीण भागात मोठा अडथळा, ऑफलाइन लसीकरण होण्याची मागणी
पालघर : राज्यासह देशात कोरोनावरील लसीकरण संदर्भात सध्या सर्वत्र राजकारण सुरू असून मुंबई लगत असलेल्या पालघरमध्ये ग्रामीण भागातील जनता अजूनही या लसीकरणापासून वंचित असलेली पाहायला मिळते लसीकरणाची नोंद करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन केले जात असले तरी मुंबई लगत असलेल्या पालघर या जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक भागात अनेक मोबाईलला नेटवर्क नसल्याने तसेच येथील आदिवासी जनतेच्या निरक्षरते मुळे हे रजिस्ट्रेशन करायचं कसं असा प्रश्न येथील जनतेसमोर सध्या उभा राहिला आहे . तर याबाबत या भागात काही गैरसमज असल्याचेही मत आहे.
राज्यातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जिल्हानिहाय लसीकरण डोस वाटप करण्यात येतं आहेत. मात्र यासाठी लसीकरण लाभार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी पालघर जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातील नागरिकांच रजिस्ट्रेशन होत असून शहरी भागातील नागरिक हे पालघर मधील ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी येत असल्याने या लसीकरण केंद्राबाहेर स्थानिक आणि बाहेर नागरिक असा वाद दिवसेंदिवस वाढलेला पाहायला मिळतोय.
पालघरमधील ग्रामीण भागातील बहुतांशी जनता हे आदिवासी आणि निरक्षर असल्याने ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती या नागरिकांना नाही त्यामुळे सहाजिकच शहरी भागातील नागरिकांच्या रजिस्ट्रेशन हे ग्रामीण भागात होत असून ग्रामीण भागातील जनता हे या लसीकरणापासून वंचित राहिलेली पाहायला मिळते.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यात अजूनही या लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती झालेली पाहायला मिळत नाही. कोरोना लसीकरण केल्यास मृत्यू होतो अथवा वर्षभरानंतर या लसीकरणाचा त्रास जाणवतो असा गैरसमज येथील जनतेमध्ये असून, येथील आदिवासी जनतेमध्ये लसीकरण संदर्भात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचं समोर येत आहे
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये काही भाग हा अतिदुर्गम असून यातील अनेक ठिकानी मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे तसंच अँड्रॉइड मोबाइल येथील नागरिकांकडे नसल्यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे गाव पातळीवर जनजागृती करून ग्रामपंचायत कार्यालय, आशा वर्कर्स तसेच गाव पातळीवर काम करणाऱ्या शासकीय कर्मचार्यांकडून जनजागृती आणि रजिस्ट्रेशन केले जावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते.
Sputnik V | यावर्षी भारतात 85 कोटींहून अधिक स्पुटनिक-V लसीच्या डोसचे उत्पादन होणार : आरडीआयएफ
याच बाबतीत आदिवासी मित्र मंडळाचे अध्य़क्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष जनाठे म्हणतात, 'पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा डहाणू तलासरी या तालुक्यातील काही भाग अतिदुर्गम असून या भागात कोरोना आजार व लसीकरणाबाबत तातडीने जनजागृती करण्यात यावी कारण या भागात मोठ्या प्रमाणात या बाबतीतले गैरसमज निर्माण झाले असून सध्या भीतीचे वातावरण आहे त्यामुळे गाव पातळीवर काम करणारे आशा वर्कर अंगणवाडी सेविका शिक्षक ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या माध्यमातून जनजागृती आवश्यक आहे तरच हा प्रश्न मिटू शाळेत,,या बाबतीत शासन अजूनही सतर्क नाही याचा खेद आहे.