Miraj : वडाच्या झाडाची फांदी तुटली अन् आयुष्याचा दोरही; मिरजेत वादळी वाऱ्यानं झाडाची फांदी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू
अग्निशमन दलाच्या जवानांनी बरेच प्रयत्न करून ती झाडाची भली मोठी फांदी बाजूला काढून यशचा मृतदेह बाहेर काढला.

Miraj : मिरज (Miraj) येथे एका तरुणांच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडलीय. कानामध्ये हेडफोन घालून वडाच्या झाडाखाली बसलेल्या तरुणाला वादळी वाऱ्याने झाड जोरदार हलत असताना आणि झाडाची फांदी मोडताना त्याला आवाज ऐकू आला नाही. यातच जोरदार वाऱ्याने झाडाची भली मोठी फांदी तुटून त्या तरुणाच्या अंगावर येऊन पडली अन त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम (वय 23 रा.माळी गल्ली, न्यू इंग्लिश स्कूल जवळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बरेच प्रयत्न करून ती झाडाची भली मोठी फांदी बाजूला काढून यशचा मृतदेह बाहेर काढला.
हर्षवर्धन कदम हा पोलीस भरतीच्या सरावासाठी रोज मिरज मेडिकल कॉलेजच्या ग्राउंड वर जात होता. सराव झालेनंतर तो कंपाऊंड भींतीवर चढून बसला. त्याने कानात हेडफोन घातले होते. हर्षवर्धन कदम जिथे बसला होता तेथेच भलेमोठे वडाचे झाड होते. हर्षवर्धनच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळे वादळी वाऱ्याने झाड जोरदार हलत असताना आणि झाडाची फांदी मोडताना त्याला आवाज ऐकू आला नाही. जोरदार वाऱ्याने झाडाची फांदी तुटून हर्षवर्धनच्या अंगावर येऊन पडली. झाडाची फांदी भली मोठी असल्यामुळे हर्षवर्धनचा जागीच मृत्यू झाला.
कानात हेडफोन घातल्यामुळे झाडाची फांदी मोडताना त्याचा आवाज हर्षवर्धनला ऐकू आला नाही. याबाबत पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची फांदी हटवून हर्षवर्धनचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. हर्षवर्धनचे वडील सलून व्यवसायिक आहेत. आज ना उद्या आपला मुलगा पोलीस भरती होईल ही आशा ते बाळगून होते. मुलाचा मृतदेह पाहुन त्याच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. महापालिका अग्निशमन दलाचे संतोष हाक्के, फायरमन रोहित निकम, ड्रायव्हर देविदास मानकरी यांनी झाडाची फांदी हटवताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र हर्षवर्धनचे प्राण वाचू शकले नाही. या घटनेची मिरज शहर पोलिसात नोंद झालीय.
संबंधित बातम्या
























