वीजबिलात सूट देण्यास ऊर्जा मंत्रालय तयार, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिल्याचा ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचा दावा
लोकांना वीजबिलात दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात ढकलला आहे.
मुंबई : लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वीजबिलाचा शॉक बसला. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार असून राज्य सरकारचा त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे लोकांना वीजबिलात दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात ढकलला आहे.
कोरोना काळात राज्यातील जनतेला भरमसाठ वीजबिले गळ्यात मारणाऱ्या ऊर्जा मंत्रालयाने आजतागायत लोकांना यातून दिलासा दिलेला नाही. वीजबिलात सर्वसामान्य लोकांना सवलत देण्याचा प्रस्ताव ऊर्जा खात्याने बनविला असून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे लोकांना वीजबिलात दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले.
12 ऑक्टोबरला मुंबईसह इतर भागात अचानक गेलेल्या विजपुरवठा बाबत पडताळणी सुरू आहे. ऐरोलीत असलेल्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राला नितीन राऊत यांनी भेट देत पहाणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्यभार प्रेषण , टाटा, आदानी यांच्या विजवितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. सध्या मुंबईला 2800 मेगा व्हॅटचा पुरवठा केला जात असून 2030 पर्यंत पाच हजार मेगाव्हॅटची गरज भासणार असल्याने आत्तापासून याबाबत विचारविनमय सुरू करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार करण्यासाठी राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले होते. या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिले पाठविण्यात येत होती. लॉकडाउन उठविण्यात आल्यानंतर जूनमध्ये रिडिंग घेण्याचे काम सुरू झाले आणि नव्या रिडिंगनुसार एकत्रित बिले पाठविण्यात आली. मात्र, त्यातील भरमसाट रकमा पाहून हजारो ग्राहकांना मोठा शॉक बसला आहे. विविध पक्ष संघटनांनी याविरोधात आंदोलनेही केली आहेत
12 ऑक्टोबरचा दिवस मुंबईच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहील. 24 तास धावणाऱ्या मुंबईला 12 ऑक्टोबरला ब्रेक लागला. कारण वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर सप्लायचा कळवा येथील ग्रीड फेलियर झाला होता. ज्यामुळे संपूर्ण एमएमआर रिजनचा विद्युत पुरवठा खंडित झाला. ज्यामुळे पूर्ण मुंबई अंधारात बुडाली होती. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामागे सायबर हल्ला असण्याची शंका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर सेलने याचा तपास सुरू केला आहे.