चंद्रकांतदादांनी स्वीकारलं सुवर्णपदक विजेत्या पैलवान सनी फुलमाळीचं पालकत्व, दरमहा 50 हजार रुपये देणार
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुवर्णपदक विजेता पैलवान सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगावमधील पालावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सनीचे पालकत्व स्वीकारल्याची माहिती दिली.
पुणे : घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द, आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहारिनमधल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारा पैलवान सनी फुलमाळेचं आयुष्य त्या कामगिरीनं पालटलं आहे. लोहगावमधील पालावर राहून ही कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचं पालकत्व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलं आहे. लोकसहभागातून घर आणि सरावासाठी तालीम, शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आणि स्वतःच्या पगारातून दरमहा 50 हजार देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद
चंद्रकांत पाटील यांनी सुवर्णपदक विजेता पैलवान सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगावमधील पालावर जाऊन भेट घेतली. त्याच्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलं. यावेळी सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॅाबी टिंगरे यांच्यासह भागातील नागरिक आणि पालावरील बांधव उपस्थित होते. सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद आहे. आज त्याने आपल्या कामगिरीने आई-वडिलांचं नाव काढलं आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने ही कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यापूर्वीच झालेला आहे. पण हा निर्णय 17 वर्षांवरील खेळाडूंना लागू आहे. त्यामुळं सनीच्या निमित्तानं 17 वर्षांखालील खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळावं, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत 60 किलो गटात सुवर्णपदक पटकावले
अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत मराठमोळा पैलवान सनी फुलमाळीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढवला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील सनी फुलमाळी याने बहरैन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत 60 किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. झोपडीत वाढलेल्या सनीचा हा प्रवास कोणत्याही स्वप्नवत कथेपेक्षा कमी नाही, जिथे परिस्थितीवर मात करून त्याने यशाचे शिखर गाठले आहे.
सनीचा परिवार गेली 15 वर्षे लोहगाव परिसरात एका झोपडीत वास्तव्यास
सनीचा परिवार गेली 15 वर्षे लोहगाव परिसरात एका झोपडीत वास्तव्यास आहे. सनीचे वडील सुभाष फुलमाळी नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात, तर आई सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशी परिस्थिती असतानाही सनीने हार मानली नाही. आजोबा आणि वडिलांनाही कुस्तीची आवड होती, पण आर्थिक अडचणींमुळे ती थांबवावी लागली. वडिलांचे स्वप्न होते की मुलांनी पैलवान व्हावे. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना (भैय्या, बादल आणि सनी) स्वतः प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पैशांअभावी वडिलांनी झोपडीजवळच्या माळरानावर तात्पुरती मातीची तालीम उभारली आणि मुलांचा सराव सुरू केला. सध्या दहावीत शिकणाऱ्या सनीने महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आता आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने देशाचा गौरव वाढवला आहे.
महत्वाच्या बातम्या:























