पीकविमा कंपन्यांच्या बाबतीत देशभर बोंबाबोंब, मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी
पीकविमा (Crop insurance) कंपन्याच्या बाबतीत देशभर बोंबाबोंब, असल्याची नाराजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड : जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर जवळपास सगळीकडेच जिल्ह्यातील 81 महसूल मंडळात अतिवृष्टी झालीआहे. गेल्या 15 वर्षानंतर प्रचंड पाऊस झाला आहे. पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. अगोदरच पंचवीस टक्के नुकसान, त्यामुळे पाहण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही. जवळपास शंभर टक्केच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तक्रारी अर्ज करण्यासाठी कधी अॅप चालतंय कधी चालत नाही, फोन लागत नाही, लागला तर कुणी उचलत नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. त्यातच विमा कंपनीच्या बाबतीत मात्र माझा व्यक्तीगत अनुभव चांगला नाही. राज्यभर आणि देशभरसुद्धा पिकविमा कंपनीच्या बाबतीत बोंबाबोंबच आहे, अशी नाराजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ते शेलगाव (ता.अर्धापूर) येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, विमा कंपनी यांच्याकडे 72 तासांच्या आत आपली तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. लाईट, ऑनलाईन न चालणे, नेट बंद अशा अनंत अडचणी शेतकऱ्यांना आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांमार्फत पिकविम्याचे तक्रारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था आहे. अगोदरच 25 टक्के नुकसान झाले आहे. त्यातच हे अतिवृष्टीचे संकट त्यात पाहण्यासारखे काय राहिले आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
ड्रोन कमेऱ्याद्वारे करणार सर्वेक्षण
जिल्ह्यात 3 लाख 61 हजार 577 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. इतक्या क्षेत्राची पाहणी करणेही सोपे नाही. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जिल्ह्याला जास्तीत विमा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे म्हणाले. पण शेवटी विमा मंजूर करणे हे कंपनीच्या हाती असते, असेही म्हणाले. शेलगाव या गावाला पर्यायी रस्ता करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, सांगवी-खडकी, मेंढला या गावासह अनेक गावाना भेटी दिल्या आहेत.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी विलास माने, तहसीलदार सुजित नरहरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, संजय देशमुख लहानकर, पप्पू पाटील कोंढेकर, बालासाहेब गव्हाणे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.