राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा जळगाव पूरग्रस्त भागात काही मिनिटांचा दौरा, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त
राज्यमंत्री अब्दुल सत्तार चाळीसगाव तालुक्यात आले होते. मात्र त्यांनी काही वेळ थांबत वरच्यावर पाहणी केली आणि परतले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला नाही.
जळगाव : चाळीसगाव येथील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले होते. मात्र त्यांनी वरच्यावर काही मिनिटांची पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री मदत जाहीर करतील, असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी करत पूरग्रस्त व बळीराजाला धीर दिला. तसेच पुरामुळे झालेल्या प्रत्येक नुकसानाची भरपाई सरकार देणार असल्याची हमी सत्तार यांनी यावेळी बोलताना दिली. परंतु नुकसान झालेल्या भागाच्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता वरच्यावर पाहणी करून राज्यमंत्री निघून गेल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
चाळीसगाव तालुका व परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतातील पिकांसह घरं, दुकानांचे मोठे नुकसान झाले. तसेच काहींचे गुरे देखील पुरात वाहून गेली आहे. या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार औरंगाबादनंतर चाळीसगाव तालुक्यात आले होते. त्यांनी सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
चाळीसगाव शहरासह अनेक गाव पुराने वेढले गेले होते. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार चाळीसगाव तालुक्यात आले होते. मात्र त्यांनी काही वेळ थांबत वरच्यावर पाहणी केली आणि परतले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला नाही. यामुळे शेतकरी व नागरिकांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे.
नुकसान झालेल्या प्रत्येक ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहचेल असे नाही. या नुकसानीची पाहणी करून तीन-चार दिवसात पंचनामे पूर्ण करून सरकारकडे आल्यानंतर नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. पुरात अनेकांच्या घरांचे नुकसान झाले, शेतातील पिके वाहून गेली आहेत. तर अनेकांची जनावरे वाहून गेली. या सर्वांचे पंचनामे करून प्रत्येक नुकसानाची भरपाई सरकार देणार, अशी हमी अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.