Mhada Lottery : आनंदवार्ता! म्हाडाकडून लवकरच 1200 घरांसाठी सोडत निघणार
Mhada Lottery : म्हाडाकडून 1200 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ही सोडत काढण्यात येणार आहे.
Mhada Lottery : घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईजवळ घर खरेदी करण्याची संधी म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हाडाकडून 1200 घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ही सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे ही घरे मुंबईजवळील शहरांमध्ये असणार आहे. या इमारतींचे बांधकाम खासगी विकासकांकडून करण्यात आले आहे.
म्हाडाच्या या सोडतीमधील घरे ही ठाणे, नवी मुंबई कल्याण-डोंबिविली, वसई-विरार या महापालिका हद्दीतील आहेत. ही घरे 20 टक्के योजनेतील असणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने मागील वर्षी 14 ऑक्टोबर रोजी आठ हजार 984 घरांसाठी सोडत काढली होती. म्हाडाच्या या सोडतीला चांगला प्रतिसाद लाभल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते. त्याची सोडतही काढण्यात आली होती. सध्या या सोडतीमधील विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे देण्यासाठी 20 टक्के योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात 4000 चौमी व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळात बांधकाम होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील 20 टक्के घरे राखीव ठेवण्यात आली आहे. ही राखीव घरे म्हाडाला देण्यात येतात. ही घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात.
सिडकोचीदेखील घरांसाठी सोडत
सिडकोकडून 1900 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. विविध नोड मधील अतिरिक्त सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 26 जानेवारी रोजी 5 हजार 700 घरांची सोडत आधीच काढण्यात आली आहे. या मध्ये आता 1900 घरांची भर पडणार असल्याने 6 हजार 500 घरे लोकांना उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबई , पनवेल मधील विविध नोड मध्ये ही घरे काढण्यात आली आहेत. यामध्ये द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील सदनिकांचा सहभाग आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरता द्रोणागिरी येथे 181, घणसोली येथे 12, कळंबोली येथे 48, खारघर येथे 129 आणि तळोजा येथे 1535, अशा एकूण 1905 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता द्रोणागिरी येथील 241, कळंबोली येथील 22, खारघर येथील 88 आणि तळोजा येथील 4252, अशा एकूण 4,603 सदनिका उपलब्ध आहेत. याप्रमाणे, एकूण 6,508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.