पालघरमध्ये पुढील तीन दिवस उन्हाचे चटके, त्यानंतर पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
Palghar News Update : पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस उन्हाचे चटके आणि त्यानंतर अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई : पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस उन्हाचे चटके आणि त्यानंतर अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सीअसने वाढ होवून 11 ते 13 मार्च पर्यंत अनुक्रमे सरासरी 37, 38, आणि 38 अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 व 15 तारखेला कमाल तापमानात घट होवून तुरळक ठिकाणी हालक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याबरोबर 13, 14 आणि 15 मार्च दरम्यान सकाळ आणि दुपारच्या आर्द्रतेत क्रमश वाढ होताना दिसून येईल व सकाळची आर्द्रता 50, 63, 70 टक्के आणि दुपारची आर्द्रता 33, 42, 48 टक्के राहण्याची संभावना आहे.
मागील दोन दिवसापासून कमाल तापमानात वाढ आणि आर्द्रतेत घट होत असल्याची नोंद झाली आहे. कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर येथील स्वयंचलित हवामान केंद्रात 9 आणि 10 मार्च रोजी कमाल तापमान 36.3, 32.2 अंश सेल्सियस आणि दुपारच्या आर्द्रतेची 40, 41 टक्के एवढी नोंद झाली आहे,अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांनी दिली आहे.
कमाल तापमानात वाढ आणि आर्द्रतेत घट होत असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळ बागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी देण्यासाठी संध्याकाळची किंवा सकाळची वेळ निवडावी. झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी, सिंचन व्यवस्थापनासाठी शक्यतो ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा, वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे आणि कोंबड्याच्या संरक्षण करावे असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्याकडून आला आहे.
14 ते 15 मार्च 2023 दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने तयार झालेल्या भाजीपाला, फळे व रब्बी पिकांची काढणी करून घ्यावी, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता आंबा मोहोरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जसे मोहोर गळून जाणे, मोहोरतून बाहेर पडलेल्या छोट्या फळांची गळ होणे, नियमित पोषक फवारणी पत्रकाचा वापर केला असेल तर पिकांवरील समस्या कमी होईल. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फळधारणा झाल्यानंतरची पोषक फवारणी घेतली नाही त्या बागांवर अशा अचानक पडलेल्या वादळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. फळे वाटाणा आकाराची असताना 0-52-34 ची 1 टक्केने फवारणी करावी, फळे सुपारीएवढ्या आकाराची झाल्यानंतर 13-0-45 ची एक टक्के तीव्रतेची फवारणी करावी आणि फळे अंड्याच्या आकाराची झाल्यानंतर कोणतेही एक पोषक फवारावे. प्रत्येक फवारणीमध्ये देशी गायीचे दहा टक्के गोमूत्र मिसळावे, जेणेकरून आंबा फळे गळण्याचे प्रमाण कमी होईल तसेच फळांचा आकार वाढविण्यासाठी मदत होईल. तसेच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर करपा रोग आणि भुरी रोग येण्याची शक्यता आहे, त्यासाठी एक टक्के कार्बनडेझिमची फवारणी करावी. या अवकाळी पावसामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडी जसे फुलकिडे, मावा आणि पांढरी माशी यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल. परंतु हवेतील आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे करपा रोग येण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी मंन्कोझेब (M 45) किंवा कोपर ऑक्सीक्लोराइड यापैकी एक बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला पीक संरक्षण तज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी दिला आहे.