Health Department : राज्याच्या आरोग्य विभागात 2226 पदनिर्मितीचे आदेश जारी
राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभागात पदनिर्मिती करण्यात आली असून त्यापैकी 2226 पदांच्या निर्मितीसाठी आरोग्य मंत्रालयाने आदेश जारी केला आहे.
मुंबई : राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं असून 2,226 पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या आदेशात असं सांगण्यात आलं आहे की, या 2,226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. आता केवळ पदनिर्मितीचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच्या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या जाहिरातीत आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचालक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार आदी पदांसाठी निर्मिती करण्यात आली आहे.
राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
या आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. पण राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- नाशिकमध्ये सावत्र आईकडून कौर्याची परिसीमा, लहानग्याच्या गुप्तांगाला चटके दिले
- कोरोना काळात 3621 बालकं अनाथ, 26 हजार मुलांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरपलं; राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचा अहवाल
- मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरताना, अजित पवारांसोबत भाजपचे कोण लोक होते?; सामनातून चंद्रकांत पाटलांना सवाल