Bypoll Election : मिशन कसबा-चिंचवड! उद्या पुण्यात प्रचाराचा 'धुराळा', कुठे सभा तर कुठे रोड शो
Pune Bypoll election : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेने देखील जोरदार प्रचार सुरू केलाय.
Pune Bypoll election : पुण्यातील कसबा पेठ (Pune bypoll election) आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 26 तारखेला दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. सर्वपक्षीय नेते प्रचारासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. कसबा आणि चिंचवड निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे.
कसबा मतदार संघ मागील अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. मागील अनेक वर्ष कसब्याची जागा भाजपकडे आहे. यावेळीदेखील ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली केल्या जात आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत थेट देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घातल्याचं दिसत आहे. अमित शाहांनी दोन दिवस पुणे दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्ते आणि उमेदवारांची भेट घेतली. शिवाय खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता काहीच दिवस बाकी असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे देखील प्रचाराला लागले आहेत. रोज महाविकास आघाडीच्या तरुण नेत्यांना सोबत घेत त्यांच्याही रॅली आणि प्रचारसभा किंवा कोपरा सभा सुरु आहेत. त्यांच्यासाठी देखील ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यांच्या प्रचारासाठी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यापूर्वी विरोधीपक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोपरा सभा घेत मतदानाचं आवाहन केलं आहे. उद्यादेखील अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो आणि बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.
Pune By election : चिंचवडमध्ये जोरदार तयारी
चिंचवड मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपचे नेते येणार आहे. पंकजा मुंडे यांनी देखील आज सभा घेत मतदानाचं आवाहन केलं आहे. उद्या त्यांच्या प्रचारासाठी भाजप नेते रावसाहेब दानवे येणार असल्याची माहिती आहे. काहीच दिवस शिल्लक असताना चिंचवडमध्ये भाजपकडून प्रचारासाठी मोठे प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रॅली काढली होती. त्यानंतर उद्या जयंत पाटील, भास्कर जाधव, धनंजय मुंडे या नेत्यांची एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे.