तुकाराम मुंढे या व्यक्तीचा विरोध नाही, तर त्यांच्या वृत्तीचा विरोध : महापौर संदीप जोशी
तुकाराम मुंढे तुम्ही तर शिस्तप्रिय, नियमाने चालणारे अधिकारी आहेत. मग नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये साधे संचालक ही नसताना आपण सरकारचा 18 कोटी 82 लाखांचा निधी एका खाजगी कंत्राटदाराला कसा काय दिला असा सवाल देखील जोशी यांनी उपस्थित केला.
नागपूर : तुकाराम मुंढे या व्यक्तीचा विरोध नाही, तर तुकाराम मुंढे या वृत्तीचा विरोध आहे. त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामांना माझा विरोध असून त्यात जातीयतेचा प्रश्नच नाही असे मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले आहे.
संदीप जोशी म्हणाले, '12 वर्षात 14 बदल्या होणे हे कधीही भूषणावह नाही. जर माझे कुणाशी ही पटत नसेल, तर माझ्या वर्तवणुकीत, कार्यपद्धतीत काही दोष तर नाही याचा विचार ही केला पाहिजे. मीच एक योग्य आणि इतर सर्व नालायक अशी विचारसरणी योग्य नाही'. पुढे जर मुंढे यांची चूक नाही हे सिद्ध झाले तर आम्ही त्यांना विरोध करणार नाही.
तुकाराम मुंढे तुम्ही तर शिस्तप्रिय, नियमाने चालणारे अधिकारी आहेत. मग नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये साधे संचालक ही नसताना आपण सरकारचा 18 कोटी 82 लाखांचा निधी एका खाजगी कंत्राटदाराला कसा काय दिला असा सवाल देखील जोशी यांनी उपस्थित केला.
तुकाराम मुंढे नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये मी संचालक आहे, एवढेच नाही तर त्याचा सीईओ ही आहे असा दावा करत होते. त्याच आधारावर तुकाराम मुंढे यांनी 6 मे 2020 रोजी एका खाजगी कंत्राटदाराला 18 कोटी 82 लाखांचा निधी ही दिला. मात्र, काल नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या 10 जुलै रोजी होऊ घातलेल्या बैठकीचा अजेंडा ही समोर आला आहे आणि त्यात तुकाराम मुंढे यांना संचालक मंडळात एक संचालक म्हणून ठेवण्याचा मुद्दा ही चर्चेत येणार असल्याचे कळवण्यात आले आहे. याच अजेंड्याचा आधार घेत महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे आतापर्यंत खोटं बोलत असल्याचे आरोप केले आहे.
जेव्हा 10 जुलैच्या बैठकीत मुंढे यांना संचालक पदी घेण्याचा विषय चर्चेला येणार आहे. तेव्हा मुंढे यांनी 6 मे रोजी सरकारचे 18 कोटी 82 लाख रुपये एका खाजगी कंत्राटदाराच्या घशात कोणत्या नियमाने घातले असा सवाल ही महापौर संदीप जोशी यांनी विचारला आहे. नियमाने वागणारे तुकाराम मुंढे चुकले आणि त्यांनी सरकारी पैसे खाजगी कंत्राटदाराला दिले हेच यातून सिद्ध होत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे.