Parbhani : रस्त्यांच्या कामांसाठी परभणीत प्रचंड वृक्षतोड, 50 ते 100 वर्षे जुन्या झाडांची कत्तल सुरू
परभणीत रस्त्यांची काम तर अर्धवट अवस्थेत आहेत, मात्र रस्त्यावरची झाडं तोडण्यात आल्याने सर्वत्र ओसाड अशी अवस्था झाल्याचं चित्र आहे.
परभणी: मागच्या काही दिवसांत परभणी जिल्ह्यातील रस्त्यांची काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कुठे राष्ट्रीय महामार्ग, कुठे राज्य महामार्ग तर कुठे रस्ता रुंदीकरणाची कामं. या सर्व कामांमुळे जिल्हावासियांची गती जरी वाढणार असली तर निसर्गाची मात्र मोठी हानी होतेय, रस्त्यांशेजारी असलेल्या जुन्या आणि महत्त्वाच्या वृक्षांच्या तोडीमुळे. जिथं पहावं तिथं सध्या जुन्या आणि महत्त्वाच्या अशा वृक्षांची कत्तल सुरु आहे. याला खुद्द सह्याद्री देवराईचे संस्थापक तथा जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही विरोध केलाय.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर-परभणी, मानवत रोड-परभणी, गंगाखेड-परभणी, परळी गंगाखेड, जालना ते जिंतुर या सर्व रस्त्याची काम मागच्या 4 ते 5 वर्षांपासून सुरू आहेत. या सर्वच रस्त्यांच्या शेजारी वड, पिंपळ, कडू निंब, गुलमोहर आदि 50 ते 100 वर्षांपूर्वीची वृक्ष आहेत जी मोठ्या प्रमाणावर कापण्यात आली आहेत. ज्याने रस्त्यांची काम तर अर्धवट अवस्थेत आहेतच. मात्र रस्त्यावरची झाडं तोडण्यात आल्याने सर्वत्र ओसाड अवस्था झालीय. ज्याचा परिणाम हा जिल्ह्याच्या तापमानावर झालाय. 15 दिवसांपूर्वी सह्याद्री/देवराई चे संस्थापक तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी परळी-गंगाखेड मार्गावर होत असलेल्या वृक्ष तोडीला विरोध करत ही झाडं तोडण्याऐवजी ती दुसरीकडे लावण्यात यावीत अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने सध्या चाचपणी सुरू असून प्रशासन आणि सयाजी शिंदे यांचे तसे प्रयत्न सुरू आहेत.
गंगाखेड-परळी नंतर जालना-जिंतूर मार्गावर प्रचंड वृक्षतोड
जिंतूर-जालना या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामासाठी रस्त्याच्या कडेचे तब्बल दीडशे वर्षापेक्षा जास्त वय असलेले चारठाणा-पिंपरी या दोन्ही गावाच्या महामार्गाच्या अंतरातील वड, पिंपळ, लिंब आणि इतर झाडाची तोड (कत्तल) रुंदीकरणाच्या कामासाठी केली जात आहे. परंतु या झाडांची तोड करण्याचे काम कोणत्या एजन्सीला देण्यात आले आहे किंवा कोण याची तोड करत आहे याची माहिती अद्याप कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येत नाही. तर या झाडांची कत्तल ही रात्रीच्या वेळेला मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने केली जात असून सकाळी मात्र त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी किंवा मजूर दिसून येत नाही. तर झाडाची तोडलेली खोड, फांद्या या ही रातो-रात नेमक्या कोठे जमा करण्यात येत आहेत. हेही कोणालाच माहिती नाही. त्यामुळे नेमकं दीडशे वर्षापासूनची झाडे राष्ट्रीय प्राधिकरणाकडून तोडण्यात येत आहेत का? त्यांची रुंदीकरणाच्या नावाखाली चोरी होत आहे. हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.