कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, मराठवाडा मात्र कोरडाच, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एकीकडे मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे धुमशान सुरू असताना मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडीच आहेत.

Marathwada Rain : राज्यातील काही भागात पावसानं धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे. अनेक भागात या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, अशातच काही भागात अद्यापही पावसानं हजेरी लावलेली दिसत नाही. एकीकडे मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे धुमशान सुरू असताना मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडीच आहेत. परभणी जिल्ह्यात मे महिन्यात तब्बल 131 मिलिमीटर पाऊस झाला यानंतर जून महिन्यात शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता असताना मात्र यंदा मृग नक्षत्र ही कोरडेच गेले.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसऱ्या बाजुला मराठवाड्यात अनेक जिल्हे कोरडेच आहेत. परभणीत पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परभणी जिल्ह्यात फक्त 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कधी पाऊस पडणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. जूनची 19 तारीख उजाडली तरी केवळ 41 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. ज्या भागात पाऊस झाला तिकडे जवळपास 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाचे म्हणजे आता ज्यांनी पेरणी केली ते शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत.
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस
सांगलीतील चांदोली धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. 24 तासात 99 मिलिमीटर पाऊस पडलाय. चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे चांदोली करण्यात 11 हजार 939 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे चांदोली धरणात झपाट्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. चांदोलीत 17.15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून धरण 49.84 टक्के भरलेय. त्यामुळे चांदोली धरणातून 1 हजार 219 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे.
सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. हा इशारा 18-06-2025 रोजी सायंकाळी 17:30 वाजल्यापासून ते 19-06-2025 रोजी रात्री 23:30 वाजेपर्यंत लागू आहे. या दरम्यान समुदामध्ये लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही ईशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:























