Marathwada Rain : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जाणार शेतकऱ्याच्या बांधावर, मराठवाड्यातील अतिवृष्टी पाहणीचे जिल्हे ठरले
Marathwada Flood : तीनही पक्षांच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा द्यावा असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. त्यानुसार सर्व मंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मुंबई : मराठवाड्यात आलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे (Marathwada Flood) जनजीवन विस्कळीत झालं असून अनेकांना स्थलांतर करावं लागलं आहे. या महापुरात शेती पिकं जमीनदोस्त झाली असून अनेक जनावरंही दगावली आहेत. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा जीव गेला असून अनेक ठिकाणी बचाव पथकाचं कार्य अद्याप सुरू आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करणार आहेत. तसेच त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीही दौऱ्यावर असणार आहेत.
CM Devendra Fadnavis Marathwada Visit : कुणाचा दौरा कुठे?
मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार असून पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत आतापर्यंत जवळजवळ 23 टक्के शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी, पूराने थैमान घातलंय. या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशा स्थितीत बळीराजा आणि सर्वसामान्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षांचे नेते सांगत आहेत.
शेतकऱ्यांना मदत करा, विरोधकांची मागणी
आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, तसंच ओला दुष्काळ जाहीर करावा अशीही मागणी होत आहे. शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी केली. तर त्याच पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करून तो पैसा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वापरावा, अशी मागणी पुढे केली.
विरोधकांच्या या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी मदतीची आकडेवारी दिली. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पूरग्रस्तांना तातडीनं मदतीसाठी जीआर काढण्यात आल्याचं ते म्हणाले. पुढल्या आठ दिवसांत 2 हजार 215 कोटी रुपये शतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं.
आमदार-खासदार फिल्डवर उतरले
सोमवारी रात्री धाराशीवरचे खासदार ओमराजे निंबाळकर हे परांडा तालुक्यात वडनेर इथे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा एक आजी आणि दोन वर्षांचा मुलगा पाण्यात अडकल्याचं त्यांना दिसलं. तेव्हा ओमराजे स्वतः पाण्यात उतरले आणि त्यांनी या आजी-नातवाला सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली.
2016 साली जिथं रेल्वेनं पाणी पुरवावं लागलं होतं, तो लातूर जिल्हा आज पूरस्थितीशी दोन हात करत आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनीही शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी देशमुख यांनी केली आहे.
सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनीही आपल्या मतदारसंघात पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत त्यांना उपयोगी साहित्याचं वाटप केलं.
उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पुरानं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटीलही मैदानात उरलेले दिसले. त्यांनी जळगावच्या पाचोऱ्या तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.
बीडमधल्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनीही पाटोदा, भाकरेवस्ती, पारगाव आणि मांजरा नदीकाठच्या अन्य पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. तसेच त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन मदतकार्याचा आढावाही घेतला.























