सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पुरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा; शक्तिपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Eknath Shinde And Maratwada Flood: मराठवाड्यातील पूरग्रस्तांना (Marathwada floods 2025) मदत देताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut criticism) यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. मिंध्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदत वाटत आहेत आणि राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
70 लाख एकर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त
मराठवाड्यात 70 लाख एकर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली असून, याचा फटका सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची घरे, पशुधन आणि अनेक गावे वाहून गेली आहेत. ही आपत्ती सामान्य नाही, कारण केवळ पिकेच नव्हे, तर ज्या माती आणि जमिनीत पीक घेतले जाते, तीच वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि शेतीच्या दृष्टीने मराठवाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याचे ते म्हणाले.
स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत करावी
संजय राऊत म्हणाले की, जर त्यांच्याकडे एवढा पैसा असेल तर त्यांनी सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी, नगरविकास खात्यानं समृद्धी, शक्तिपीठ महामार्गात ठेकेदारांकडून लुटलेले पैसे स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आव्हा शिंदे गटाला त्यांनी दिले. विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी सांगितले की, राज्यावर एवढे मोठे संकट असताना विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही, ही एक विचित्र आणि गंभीर परिस्थिती आहे.
225 कोटी रुपयांची मदत कागदावर मंजूर
संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यावर आधीच 9 ते 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि अशा स्थितीत सरकारने केवळ 225 कोटी रुपयांची मदत कागदावर मंजूर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे 10 हजार कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची मागणी केली आहे, कारण त्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहू शकणार नाही. ते म्हणाले की, सरकारकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी कोणतेही नियोजन नाही आणि यापूर्वीच्या दुष्काळ किंवा अवकाळी पावसावेळी दिलेली आश्वासनेही पूर्ण केलेली नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे सरकारच्या तिजोरीत शेतकऱ्यांसाठी पैसाच नाही. पालकमंत्री आणि इतर मंत्री दौरे करत असले तरी, स्थानिक अधिकारी शेतकऱ्यांचे ऐकत नाहीत आणि पंचनामे करत नाहीत. अधिकारीसुद्धा हतबल आहेत कारण तिजोरी रिकामी आहे.
विरोधी पक्षनेता सरकारने ठेवला नाही
ते म्हणाले की, संकटाच्या काळात जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणारा विरोधी पक्षनेता सरकारने ठेवला नाही. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकशाही आणि महाराष्ट्राच्या जनतेविरोधात केलेला कट आहे, असा आरोप राऊत यांनी केला शिवसेनेने विधानसभेसाठी भास्कर जाधव आणि काँग्रेसने विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांचे नाव सुचवूनही त्यांची नियुक्ती केली जात नाही, जेणेकरून जनतेचा आक्रोश दडपला जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या























