साहेब जगायचं कसं सागा? महापुरात उद्ध्वस्त शेतकऱ्यांची आर्त हाक; उद्धव ठाकरे म्हणाले, खचू नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका, आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो
Marathwada Flood 2025: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी साहेब जगायचं तरी कसं सांगा? अशी आर्त विचारणा केली.

Marathwada Flood 2025: सततची नापिकी आणि पाचवीलाच पुजलेल्या दुष्काळामुळे मराठवाडा अवघा होरपळून गेला असतानाच यंदा मात्र निसर्ग मराठवाड्यावर (Marathwada Flood 2025) अक्षरश: कोपला आहे. मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांमध्ये महापुराने दैना केली आहे. मात्र, शेतीसुद्धा मातीसकट खरडून महापुरात गेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर जगायचं तरी कसं? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे मंत्रिमंडळ मराठवाडा दौऱ्यावर असतानाच आज (25 सप्टेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Marathwada visit) यांनी मराठवाडा दौरा केला व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी साहेब जगायचं तरी कसं सांगा? अशी आर्त विचारणा केली.
वेडवाकडं पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या हाती काही नाही. मात्र, धीर देण्यासाठी आलो असल्याचे सांगत खचू नका, वेडवाकडं पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो अशी साद शेतकऱ्यांना घातली. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन सुद्धा दिलं. उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर धाराशिवसाठी रवाना झाले. लातूरमधील काटगावमध्ये आणि तांदूळजामध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर साहेब आमची कर्जमाफी (Farmers loan waiver demand Maharashtra) झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी आपल्याला मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंचनामे करताना अधिकारी आडमुट्टी भूमिका घेत असतील तर आपण सोबत आहोत, असे सांगत त्यांनी नुकसान पंचनाम्याबाबत (Panchanama flood damage Maharashtra) उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला.
सरकारने केलेली मदत पुरेशी आहे का?
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारने (Maharashtra flood relief package) केलेली मदत पुरेशी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केल्यावर शेतकरी म्हणाले की, सर्व जमीनच वाहून गेली आहे. आता नवीन माती आणून टाकण्यापासून अनेक कामे करायची आहेत. त्यामुळे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. जमिनी वाहून गेल्याने पुढील हंगाम सुद्धा अडचणीत आल्याचे शेतकरी म्हणाले. मुख्यमंत्री आले आणि निघून गेले, त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तुटपंजी
जमीनच वाहून गेली आहे तर शेतकरी किती अडचणीत आला आहे याची जाणीव सरकारने ठेवावी. आता शेतकऱ्यांना जगण्यासाठी मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग आहे, इथं आवर्षण नेहमी आहे. मात्र, पहिल्यांदाच इथं अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थितीचे मोठं संकट ओढवलं आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचं आहे. सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांप्रमाणे असून नुकसान पाहता जाहीर केलेली मदत तुटपंजी आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना साथ सोबत करण्यासाठी आपण आलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























