नागरिकांनी सोडला सुस्कारा ! जायकवाडीनंतर मराठवाड्यातील दुसरे मोठे येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर, शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार
खरीप हंगामानंतर आगामी रब्बी पिकांसाठी पाणी मिळणार या आशेने शेतकरीही सुखावले आहेत.
Marathwada Dam water storage: राज्यात ऑगस्ट अखेरीस झालेल्या पावसानं एकीकडे अतिवृष्टीने हजारो हेक्टर पिके पाण्यात गेल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील धरणं काठोकाठ भरत असल्याचे दिसत आहे. जायकवाडी पुर्ण क्षमतेनं भरल्यानंतर आता मराठवाड्यातील दुसरं मोठं येलदरी धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणात आता ७७.५९ टक्के पाणीसाठा झाला असून परभणी, नांदेड, हिंगोली, वसमत पूर्णा शहरांसह शेकडो गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. येलदरीत मागील काही महिन्यांपासून खूप कमी पाणीसाठा असल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चिंता होती. आता धरण ७७.५९ टक्के भरल्यानं शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडलाय.
खरीप हंगामानंतर आगामी रब्बी पिकांसाठी पाणी मिळणार या आशेने शेतकरीही सुखावले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिक नगर विभागात गोदावरीला पूर आला होता. परिणामी पुराचे पाणी थेट जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. दरम्यान, मराठवाड्यातील बहुतांश धरणांमध्ये किती पाणी भरले आहे?पाहूया..
मराठवाड्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा किती?
जायकवाडी धरणात आता ९८ टक्के पाणीसाठा झाला असून परभणीतील निम्न दुधना २५.५९ टक्के, पूर्णा येलदरीत ७७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. बीडच्या माजलगाव धरणामध्ये १२.३७ टक्के तर मांजरा धरणामध्ये २४.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. ऊर्ध्व पैनगंगा धरणात ७१.४७ टक्के तर तेरणा धरणात २५.९२ टक्के पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
जायकवाडी धरणातून विसर्ग
दाेन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले . जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातून गोदापत्रात मंगळवारी 9432 क्युसेक वेगाने पाण्याने विसर्ग सुरू करण्यात आला होता.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
माजलगाव तालुक्यात मागील आठ दहा दिवसापासून गायब झालेल्या वरुणराजाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली. मध्यरात्री थोड्या प्रमाणात तर सोमवारच्या पहाटेपर्यंत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. या पावसामुळे मृतसाठ्यात असलेले माजलगाव धरण मृत साठ्याबाहेर येत थेट 18 टक्क्यावर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
माजलगाव एरवी भरते परतीच्या पावसावर
माजलगाव धरण दरवर्षी हे परतीच्या पावसावरच भरते. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी देखील अत्यल्प पाणीसाठा असलेले माजलगाव धरण परतीच्या पावसावरच भरले होते. मागील वर्षी सरासरीहून कमी पाणीसाठा झाल्यानं माजलगाव धरण कोरडंठाक झालं होतं. दोन दिवसांपूर्वी मृतसाठ्यात असणारं माजलगाव धरण आता भरेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. .