Marathi Language : मराठीला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या यावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांकडे मागणी
Marathi Classical Language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव गेल्या नऊ वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित असून त्याला लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई: मराठी भाषेला अभिजात दर्जा (Marathi Classical Language) देण्यात यावा या आशयाचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला असून त्याला लवकरात लवकर मान्यता द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करीत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीने काढला असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
यासंदर्भात राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी यासंदर्भात सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेंतर्गत सुमारे एक लाख 20 हजारांहून अधिक पत्र राष्ट्रपतींना पाठविले आहेत. महाराष्ट्राच्या खासदारांनी वेळोवेळी याविषयी संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी 3 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यसभेत सांगितलं होतं. हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे बऱ्याच कालवधीपासून प्रलंबीत असून त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अभिजात भाषेचा दर्जा ( Classical Language) मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात,
1) भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
देशातल्या अभिजात भाषांचा प्रवास
2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली
त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू
2013 मध्ये मल्याळम
2014 मध्ये ओडिया भाषांना हा दर्जा दिला गेला
देशात आत्तापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. पहिली भाषा 2004 मध्ये तामिळ आणि त्यानंतर 2014 मध्ये उडीया भाषेला मिळाला आहे.