Manoj Jarange Patil : गावकऱ्यांचा आग्रह, अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; आज घेणार पुढचा निर्णय
Manoj Jarange Patil : गावकऱ्यांनी आग्रह केल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन घेतले आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यांनी सलाईन लावावे असा आग्रह गावकऱ्यांनी केला होता. त्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन घेतले आहे. डॉक्टरांच्या पथकाने रात्री साडेबारा वाजता तपासणी करुन, जरांगे पाटील यांना सलाईन लावले. दरम्यान, आज सकाळी 10 वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुपारी दोन वाजता ते सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.
मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यांनी सलाईन लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता जरांगे पाटलांना सलाईन लावले आहे. माझं गाव भावनिक झालं आहे. गावातील महिला रडत आहेत, ते जरा काळजाला लागतंय. माझ्यात निर्णय घ्यायला क्षमता राहिलेच नाही. सरकारला वेळ का पाहिजे हे कळले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार असल्याचे पाटील म्हणाले. आरक्षण खरंच देणार का याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे असे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, सर्वपक्षीय बैठकीत ठराव
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासंबधी अॅड. शिंदे यांची समिती नेमली असून त्यामध्ये जरांगे यांच्या प्रतिनिधीने यावं असं आवाहनही त्यांनी केलं.
उपोषणासंबंधी आज दोन वाजेपर्यंत निर्णय घेणार
समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही, आमचा कोणी तज्ज्ञ जाणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. सरकार आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो, आमचं गाव कौतुक करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सर्वांशी चर्चा करुन उपोषणासंबंधी आज दोन वाजेपर्यंत निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी कोणालाही भीत नाही, मी समाजाला भितो असेही ते म्हणाले.
गेल्या 15 दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या 15 दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. रविवारपासून मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळं उपचार घ्यावेत अशी आग्रही मागणी गावकऱ्यांनी त्यांना केली. अखेर त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: