बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही, मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही : मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर टीका केली. काहीही झालं तरी मी मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे जरांगे म्हणाले.
मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी मराठा समाजाला ओबीसी (OBC Reservation) प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार, असे मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे म्हणत आहेत. आज मनोज जरांगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी नेत्यांचा त्याला होणारा विरोध यावर भाष्य केलंय. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे.
मराठा समाज एकत्र आलाय, म्हणून त्यांंचं पोट दुखतंय
मला फुसके दावे सांगू नका. मी मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी बलिदान देण्याची वेळ आली तरीही मी घाबरणार नाही. मी कोट्यवधी मराठा समाजाची बाजू घेत आहे. माझा समाज माझ्या पाठीशी आहे. गोरगरीब मराठा समाजाची पोरं मोठी झाली पाहिजेत यासाठी मी लढत आहे. मराठा समाज एकत्र आला आहे, यामुळे यांचे पोट दुखत आहे. मराठा समाज एकत्र आला, त्याचे मतात रुपांतर झाले. त्यामुळे त्यांना मला हटवायचे आहे. तुम्ही आमच्या जातीला कमी समजत आहात.
त्यांना धनगर आणि मराठा बांधवांत भांडण लावायचे आहे
मनोज जरांगे यांनी यावेळी छगन भुजवळ यांच्यावर त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. हे स्वत:ला आम्ही जातीवादी नाहीत, असे सांगतात. मात्र आता कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याला काय म्हणावे. येवल्याचे जाहीरपणे म्हणाले की उपोषण करणारे माझे लोक आहेत. माझे पोरं आहेत. माझे फंटर आहेत. आता फंटर म्हणजे काय हे मला माहिती नाही. त्यांना धनगर आणि मराठा यांच्यात भांडण लावायचे आहेत. भांडण लावून ते मोकळे होणार आहेत. उपोषण करणाऱ्यांना आपण कोणासाठी लढत आहोत, हे समजत नाहीये. मी आतापर्यंत धनगर बांधवांच्या एकाही नेत्याला काहीही बोललो नाही. याचा अर्थ त्यांनी काहीही बोलावे असे नाही.
शासकीय शिष्टमंढळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार
दरम्यान, शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर आणखी एक सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची भेट घेणार आहे. मात्र, त्यापूर्वी शनिवारी सकाळी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) तडकाफडकी वडीगोद्री येथे दाखल झाले. त्यामुळे आजदेखील राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक घडामोडी घडणार आहेत.
हेही वाचा :