एक्स्प्लोर
न्यायालयाची ढाल करुन, आरक्षणाची टोलवाटोलवी, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
लोकसभेत शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
नवी दिल्ली: मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजला. राज्यसभेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवेदन दिलं. संभाजीराजेंनी मराठीत आपलं म्हणणं मांडलं.
तर लोकसभेत शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.
विनायक राऊत काय म्हणाले?
“गेल्या पाच वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा उभा राहिला आहे. केवळ मराठाच नव्हे तर धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण हे मुद्दे आहेत.
गेल्या काही दिवसात मराठ्यांचे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले. या मोर्चांची जगाने दखल घेतली. अत्यंत शांतताप्रिय, कुठेही गडबड नाही, बेशिस्त नाही, असे मोर्चे निघाले. लोकशाहीला आदर्शवत मराठा मोर्चे निघाले. दुर्दैवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे केवळ न्यायालयाची ढाल करुन, ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार टोलवाटोलवी करतंय, त्याचा परिणाम म्हणून सध्या औरंगाबादमधील परिस्थिती आहे.
आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा आम्ही जलसमाधी घेणार, असं लेखी पत्र मराठा आंदोलकांनी प्रशासनाला दिलं होतं. मात्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतली नाही. काल गोदावरी नदीकिनारी आंदोलक जमले. जवळपास तासभर त्यांनी निदर्शने केली. मात्र राज्य सरकार, जिल्हा प्रशासन किंवा पोलीस अधीक्षक कोणीही त्याकडे फिरकलं नाही. केवळ 3 पोलीस आणि 45-50 आंदोलक होते. ते नदीकडे जात होते मात्र पोलिसांनी त्यांना रोखण्याचं काम केलं नाही.
मराठा आंदोलकांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली”, असं विनायक राऊत म्हणाले.
धनंजय महाडिक, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनीही मराठी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.
“गेली 2-3 वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र त्यांच्या मागणीचा विचार झाला नाही. काल औरंगाबाद-नगर हायवेवर इशारा देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने, काकासाहेब शिंदे नावाच्या युवकाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली.
मराठा समाज बहुतांश शेतकरी आहे. त्यामुळे या समाजातील युवकांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं, यासाठी आपण प्रयत्न करावे. तसंच काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला सरकारने 50 लाख रुपये द्यावे, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली.
संभाजीराजे काय म्हणाले?
राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा 1902 साली आरक्षण दिलं होतं. बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसीसह सर्व जातींचा समावेश होता. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाचाही समावेश होता. आज स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने भावना तीव्र झाल्या आहेत.
अनेक मोर्चे मागीलवर्षी निघाले. त्याची दखल देशानेच नव्हे तर जगाने घेतली. पण आता भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला माझ्या दोन सूचना आहेत.
पहिली सूचना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावं आणि त्यांच्या मागण्या मान्य करावं.
दुसरी सूचना - राजकारण करण्यापेक्षा सर्व पक्षांना एकत्र बोलवून, मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा
राज्यसभा सभापतींची टीपणी
संभाजीराजेंच्या या निवेदनानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडून यांनी, आरक्षणाची मागणी योग्य आहे, पण मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला.
महाराष्ट्र बंद
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या आज बंद आहेत. काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैद्राबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. उस्मानाबादमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जातोय.
संबंधित बातम्या
संभाजीराजेंच्या दोन सूचना, व्यंकय्या म्हणाले- मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य?
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं
LIVE मराठा क्रांती मोर्चाकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता? मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यूअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement