(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Maratha Akrosh Morcha LIVE Updates : सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता
Maratha Akrosh Morcha LIVE Updates : सोलापुरात आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरात आज नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
LIVE
Background
सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण दिलं होतं मात्र यांपैकी कुणीही मोर्चाला येणार नसल्याची माहिती असून नरेंद्र पाटील यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील. शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात येत आहे. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली असल्याचे खोटे संदेश फिरत आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मोर्चा, आंदोलनास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त
कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्यावतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. परवानगी नसली तरी मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम आहेत. त्यामुळे सोलापुरात आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरात आज नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त शहर आणि ग्रामीण हद्दीत तैनात करण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तर शहरात येणारे सर्व प्रमुख मार्ग पोलिसांच्या वतीने सील करण्यात येत आहेत. मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड, सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे
सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता
सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. आक्रोश मोर्चाच्या आयोजकाचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. संचारबंदी झुगारुन सोलापुरातील अनेक आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते.
सोलापुरात मराठा संघटनांचा आक्रोश मोर्चा, संचारबंदी झुगारुन मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात
सोलापुरात मराठा संघटनांचा आक्रोश मोर्चा. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच संचारबंदी झुगारुन मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. संचारबंदी झुगारुन मराठा संघटनांचा आक्रोश मोर्चा सुरु झाला आहे. मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख वेशांतर करुन आक्रोश मोर्चाच्या ठिकाणी
पोलिसांनी रस्त्यात अडवल्याने स्वतः रुग्ण असल्याचे भासवत हाताला सलाईन लावून भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख मराठा आक्रोश मोर्चात सहभागी झाले. पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांनी एक ही वाहन येऊ देणार नाही सांगितले होते. पोलिसांच्या माध्यमातून सरकार मोर्चा दडपणाचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप श्रीकांत देशमुख यांनी केला.
मोहिते पाटील यांच्या गाड्या टेंभुर्णीमधून सोडल्या, 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना
मोहिते पाटील यांच्या गाड्या टेंभुर्णीमधून सोडल्या. 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश आहे.
सोलापुरात मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात, पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी
सोलापुरात आक्रोश मोर्चासाठी मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.