शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे अनेक इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात, मनोज जरांगेंसोबतही चर्चा सुरु : राजू शेट्टी
आमची आघाडी ही तिसरी आघाडी नसून पहिली आघाडी आहे. त्या दोन्ही आघड्यांनी काय सातबारा नावावर करुन घेतलाय का? असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केलं.
Raju Shetti : आमची आघाडी ही तिसरी आघाडी नसून पहिली आघाडी आहे. त्या दोन्ही आघड्यांनी काय सातबारा नावावर करुन घेतलाय का? असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केलं. राज्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी गटाचे अनेक इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचे देखील शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी आज बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्यासाठी त्यांच्याशी संभाजी महाराज छत्रपती यांची चर्चा सुरु असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. राज्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे अनेक इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचे देखील शेट्टी यांनी सांगितले आहे.अनेक लोक आम्हाला भेटतात त्यांना आम्ही का संधी देवू नये असा सवाल देखील शेट्टी यांनी विचारला.
‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी आकाराला येत आहे. त्यासाठी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीत ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा झाली आहे. ही आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली आहे. सध्या ज्याप्रकारचे राजकारण सुरू आहे, त्याला राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळेच आम्ही सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वास आहे की, मतदार आम्हाला साथ देतील आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करतील. तिसऱ्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत आम्ही सर्व नेते बसून निश्चित चर्चा करू. संपूर्ण 288 जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. कालपासून राज्याच आचारसंहिता देखील लागू झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 नोव्हेंबला समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
तिसऱ्या आघाडीचा परिणाम होणार का? शरद पवार म्हणाले, माझी झोप उडाली, मी भयंकर अस्वस्थ