बच्चू कडूंच्या आंदोलनाला जरांगे पाटलांची साथ, 15 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील काल बच्चू कडू यांची भेट घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांनीही कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Manoj Jarange Patil : गेल्या सहा दिवसापासून प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षाचे नेते पदाधिकारी येत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील काल बच्चू कडू यांची भेट घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांनीही कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये 15 जूनला चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
सगळ्या शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावं
राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनाला शांततेत पाठिंबा द्यावा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांनी आपले एक दिवसाचे काम बाजूला ठेवून चक्काजाम मध्ये सहभागी व्हावे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पैठण फाटा शहागड येथे आमचं चक्काजाम आंदोलन ठरल्याचे जरांगे म्हणाले. या आंदोलनात जात-पात धर्म सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावं असेही जरांगे म्हणाले. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवस शांततेत सगळ्यांनी रस्त्यावर यावं असेही जरांगे म्हणाले.
नेमक्या काय आहेत मागण्या?
1. दिव्यांग व विधवा महिलांना रु 6000/- मानधन देण्यात यावे.
2. आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी शेतमालाला MSP (हमीभाव) वर 20 टक्के अनुदान देण्यात यावे.
3. दि.07 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे.
4. युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या.
5. शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रू 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
6. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे.
7. पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MSP मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना 3:5 रेषो लावून दुग्ध व्यवसायसूध्दा MSP ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी 10,000/- मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा.
8. ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे.
9. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.
10. मनरेगा मधील मजूरी रू 312/- वरून रु.500/- करण्यात यावी.
11. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे.
12. दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु.50/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रू 60/- प्रती लिटर मिळावा. i
13. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40/- रूपये बाजार भाव होई पर्यत निर्यात बंदीचा निर्णय करू नये.
14. सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300/- रूपये दर 1 टक्के रिकव्हरी बेस रेट धरुन मिळावा. तसेच पुढील 11 टक्के सिकव्हरीसाठी 430/- रूपये एफआरपी दर मिळ वेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत.
महत्वाच्या बातम्या:
...तर रस्त्यावर उतरावं लागेल, शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत रस्ते बंद करा, मनोज जरांगेंचा इशारा, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा
























