मराठा समाजात मेसेज गेलाय की, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावं लागणार: मनोज जरांगे पाटील
तुम्ही कितीही बदनाम करण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मला तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही माझी निष्ठा कधीच विकत घेऊ शकत नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
जालना : मराठा समाजात (Maratha Reservation) असा मेसेज गेलाय, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्याला लढून मिळवावे लागणार आहे. त्यामुळे मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केले आहे.मला बाजूला काढण्याचे प्रयत्न आता त्यांनी थांबवावे, मी घाबरून माझा आरक्षणाचा लढा थांबवणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजात असा मेसेज गेलाय, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्याला लढून मिळवावे लागणार आहे. मराठा समाजाचे गोरगरीब पोरं मोठे व्हावे यासाठी मी लढतोय. आता ही वेळ आहे, मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. आमदार अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील असं वाटत आहे.
तुम्ही माझी निष्ठा कधीच विकत घेऊ शकत नाही : जरांगे
गेल्या काही दिवसांपासून आंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राहत्या घरावर ड्रोन फिरताना दिसून आला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये व मराठा आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पाश्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही कितीही बदनाम करण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मला तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही माझी निष्ठा कधीच विकत घेऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.
एका गोट्यात ड्रोनला पाडलं असतं… : मनोज जरांगे
गेल्या चार पाच दिवसापासून आंतरवली सराटीत ड्रोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ड्रोन खूप लांब आहे, तो टप्प्यातच येत नाही, नाहीतर एका गोट्यात आम्ही त्याला पाडलं असतं, असे म्हणत जरांगेंनी खिल्ली उडवली. त्यामुळे ते मला काय मारतात, त्यांनी त्या नादात पडू नये असे म्हणत मी कोणाला घाबरत नाही माझा रस्ता ‘क्लिअर’ असल्याचे ते म्हणाले.
मराठे विधानसभेला ताकद दाखवतील : मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, मला ते मॅनेज करू शकत नाहीत. माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमचे हे शेवटचे प्रयोग सुरु आहेत. हे खूप दिवसांपासून सुरु आहे. व्हिडिओ, रेकॉर्डिंग करायचे, समाजात गैरसमज पसरवायचे आणि मला तिथून हटवण्यासाठी हे सुरु आहे. मी मराठा समाज एकजूट ठेवल्यामुळे यांची ही पोटदुखी असल्याचे ते म्हणाले. मराठ्यांनी त्यांची ताकद दाखवली आता विधानसभेलाही ते दाखवतील असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळंच त्यांनी असे प्रयोग करत असतील. कितीही झाकलं तरी थांबत नाही.
मराठ्यांसाठी मागे हटणार नाही : मनोज जरांगे
माझा रस्ता क्लिअर आहे. त्यामुळे शांत रहा. दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात, जातीचं, समाजाचं वाटोळं करायला निघाला आहात. आपल्यालाही परिवार आहे. मतभेद असतात. त्यामुळ अशी चूक करू नका. मी भीत नाही. मला जे बोलायचे ते स्पष्ट बोलतो असे जरांगे म्हणाले. ड्रोनला मी घाबरत नाही. मराठ्यांसाठी मागे हटणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मध्यरात्री ड्रोनच्या घिरट्या
सोमवारी मध्यरात्री एक Drone मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन पाहणी केली. आंतरवालीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असली तरी मराठा आंदोलक हे काहीसे धास्तावले आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी जरांगे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
Video :
हे ही वाचा :