Majha Katta : अंतरवालीत पोलिसांनीच एकमेकांना मारलं, निष्पाप महिला-मुलांवर लाठीचार्ज केला; मनोज जरांगेंचा मोठा आरोप
Manoj Jarange On Maratha Reservation : पोलिसांनी आंदोलकांना मारताना आंदोलक त्यांच्या हातापाया पडत होते, त्याचे व्हिडीओही आपल्याकडे असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
मुंबई: पोलिसांना जर मला रुग्णालयात न्यायचं होतं तर त्यावेळी का नेलं नाही? पोलीस हेल्मेट आणि हातात काट्या घेऊन आले आणि त्यांनी महिला आणि मुलांवर लाठीचार्ज केला, एवढंच काय तर पोलिसांनी पोलिसांवरच काठ्या हाणल्या असा मोठा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. पोलिसांना आपलं आंदोलन काही करून मोडून काढायचं होतं, त्यासाठी ते तयारीनेच आले होते असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले.
राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी आरोप केला होता की, मराठा आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी पोलिसांना मारलं आणि 70 पोलीस जखमी झाले. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सगळं आंदोलन शांततेत सुरू होतं. पण त्या ठिकाणी 700-800 पोलीस आले, पोलिसांनी उगाचच काहीतरी प्रकार सुरू केले. उगाच कुणाला तरी हटकायचे. त्यावेळी कार्यकर्त्यांनी हात जोडल्याचे व्हिडीओ आहेत.त्यानंतर मग धक्काबुक्की सुरू झाली. त्यावेळी मोठी धूळ उठली आणि कुणीच कुणाला दिसत नव्हतं. त्याचा फायदा पोलिसांनी घेतला आणि तुफान लाठीचार्ज केला. त्यामध्ये पोलिसांनी पोलिसानाही लाठ्या मारल्या. त्यावेळी सगळे लोक त्यांच्या हातापायी पडले, पण पोलिसांनी ठरवूनच आले होते. पोलिसांनीच भिंतींच्या विटा काढल्या आणि लोकांवर फेकल्या. पोलिसांनी इतक्या निष्पाप लोकांवर हल्ले केले.
पोलीस पहिल्यांदा म्हणाले की लाठीचार्जचा आदेश हा वरून आले होते. आता म्हणतात की पोलिसांचे आदेश होते. पोलिसांनी निष्पाप महिलांवर लाठीचार्ज का केला? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. लोकांना मारून पोलिसांना हे आंदोलन मोडून काढायचं होतं असा आरोपही जरांगे यांनी केला.
पोलिसांनी निष्पाप महिलांवर लाठीचार्ज का केला?
अंतरवालीतील कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं पण त्यांच्यावर कटकारस्थानाचा गुन्हा का नोंद केला असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, पोलिसांचे म्हणणं होत की ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होते. पण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी असं काय झालं की मला रुग्णालयात न्यायला आले. त्या दिवशी पोलीस आले ते हेल्मेट आणि काठ्या घेऊनच आले. त्या ठिकाणी महिला त्यांच्या लेकरांना घेऊन बसल्या होत्या. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. मला जर त्यांना रुग्णालयात घेऊन जायचं होतं तर आतापर्यंत का नेण्यात आलं नाही?
आम्ही जातीयवादी असतो तर प्रकाश आंबेडकर किंवा धनगर समाजाने आम्हाला पाठिंबा दिलाच नसता. जातीयवादी म्हणजे रक्तपात करणे होय, एखाद्या समाजाच्या आरक्षणासाठी बोलणारे जातीयवादी कसे? त्यामुळे सुषमा अंधारेंनी हा विषय जातीयवादाकडे नेऊ नये असा सल्लाही मनोज जरांगे यांनी दिला.
भुजबळ खलनायक आहेत का?
गेल्या 10- 15 वर्षांपासून छगन भुजबळांचा मराठा आंदोलनाला विरोध असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. त्यांना विरोध हा वैयक्तिक नाही, पण आता त्यांच्यावर बोलणार नसल्याचंही ते म्हणाले. जरांगे म्हणाले की, आता कुणबीच्या नोंदी सापडल्यानंतर मराठ्यांना वेगळं आरक्षण का? त्यांचा आता विरोध का? कायदा आणि घटना काय सांगते ते पाहा. ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना वरचं आरक्षण का? त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला भुजबळांचा विरोध का?
ही बातमी वाचा: