Manoharmama | मनोहरमामा यांच्यावर लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल
मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्यावर एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झालेत. करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा तर बारामतीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडालीय.
सोलापूर : मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्यावर एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाले आहे. करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा तर बारामतीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोहरमामा चर्चेत आहेत. त्यांनी अनेक भक्तांना आर्थिक गंडा घातल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात त्यांनी पुण्यात आपल्या वकिलासह पत्रकार परिषद घेत या आरोपांचे खंडन केले होते.
बाळूमामांचे शिष्य म्हणून लोकांसमोर स्वतःला आणणारे मनोहरमामा भोसले यांच्या विरोधात आज एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाले. करमाळा पोलीस स्टेशनमध्ये थेट लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उठली आहे. शेजारच्या जिल्ह्यातील एक महिला भक्त घरगुती अडचणींमुळे मनोहरमामा यांचा सल्ला घेण्यासाठी काही महिन्यापूर्वी करमाळा तालुक्यातील उंदरागाव येथील मठात आली होती. यावेळी तिला तीन वाऱ्या करण्यास सांगण्यात आले. यावेळी आपला लैंगिक छळ झाल्याची तक्रार आता या महिलेने दिली असून आर्थिक फसवणूक झाल्याचेही तिने करमाळा पोलिसांना सांगितले आहे.
यावरून करमाळा पोलिसांनी भादंवि 376, 2N, 378 D, 354, 385 आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक अशा भागातून दर अमावस्येला या मनोहरमामांच्या दरबारात हजारोंच्या संख्येने भाविक येत होते. आता थेट लैंगिक शोषणाचा गुन्हा एका महिला भक्ताने दाखल केल्याने मनोहरमामा यांच्या भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज बारामती येथेही एका आजारी भक्ताला बरे करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा बारामती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बारामती येथील शशिकांत खरात यांच्या वडिलांना गळ्यातील थायरॉईड कॅन्सर आहे. त्यांना बरे करतो म्हणून मनोहरमामा यांनी खरात यांचेकडून 2 लाख 51 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार खरात यांनी बारामती पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार मनोहर भोसले यांचा त्यावेळी बारामती तालुक्यातील मौजे सावंतवाडी, गोजुबावी येथे मठ होता. या मठात खरात यांना दाखविल्यावर त्यांना बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा खाण्यास दिल्याचे तक्रारीत म्हणाले असून मनोहरमामाचे सहकारी विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून पैसे घेतल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार मनोहर भोसले यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.