(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makar Sankrant : कुंकवा पलिकडची संक्रांत... विधवा महिलांनी साजरी केली मकर संक्रांत
Makar Sankrant : विधवा महिलांना कोणताही सणवार साजरा करता येत नाही. पण बीडमध्ये काहीतरी सकारात्मक घडलं असून विधवांना सन्मान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बीड: मकरसंक्रात म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण...आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रात साजरी करतात. याच मकरसंक्रातीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बीडच्या घटशीळ पारगावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी रंगलेला हा मकरसंक्रातीचा सोहळा. मनिषा जायभाये गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रातीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात. एका अपघातात मनिषा यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांना सणावाराला जी वागणूक मिळाली ती वागणूक इतर महिलांना मिळू नये म्हणून त्यांनी हा जनजागृतीचा उपक्रम सुरू केला आहे.
या कार्यक्रमात दोनशेच्या वर विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप करण्यात आलं. आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक महिलांनी संक्रांतीचा सण साजरा केला नव्हता. आज मात्र या ठिकाणी या महिलांचा जो सन्मान झाला तो पाहून या महिला भारावून गेल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा गोडवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
नवीन वर्ष सुरू झालं की मकर संक्रातीचा सण हा वर्षातील पहिलाच सण. त्यामुळे मोठ्या उत्साहात ही संक्रात साजरी केली जाते. या दिवशी अनेक महिला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना वाण देण्यासाठी आमंत्रण देतात. अशा कार्यक्रमांत मात्र विधवा महिलांना कोठेही आमंत्रण दिल जात नाही. आता मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून या महिला आनंदात आपली संक्रात साजरी करणार आहेत.
घटशीळ पारगावांतील सहभागी महिलाना आपला जोडीदार सोडून गेल्याच दुःख होतंच, पण चेहऱ्यावर एक सन्मान मिळाल्याचा आनंद पण होता. हाच आनंद आणखी द्विगुणीत होण्यासाठी समाजाने आता पुढे येण्याची वेळ आलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Wan for Sankranti 2022 : 'वाण' द्यायचा विचार करताय? जाणून घ्या सर्वांना उपयोगी पडेल असं 'वाण'
- Makar Sankrant : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीचं संक्रांत स्पेशल फोटोशूट
- Makar Sankrant: 'सई लोकूर'नं केली संक्रांतीची तयारी; पाहा खास फोटो