एक्स्प्लोर
राज्यभरात लाखो हेक्टर क्षेत्रात पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल, पंचनामे सुरु
अनेक ठिकाणी गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना अंकुर फुटत आहेत. हीच स्थिती ज्वारीची आहे. कणसामधील दाण्यांचे बीजांकुरण होत आहे. कणसे काळी पडली आहेत. कापसाची बोंडे सडायला लागली आहेत, तर फुटलेल्या बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झालेली आहे.
![राज्यभरात लाखो हेक्टर क्षेत्रात पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल, पंचनामे सुरु Major loss of crops in lakhs of hectares across the Maharashtra राज्यभरात लाखो हेक्टर क्षेत्रात पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल, पंचनामे सुरु](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/30173313/farmer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नुकसानीचा एकदा वाढू शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. यामधून शेतकरी सावरत नाही तोच कसंबसं आलेल्या पिकांचंही संततधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना अंकुर फुटत आहेत. हीच स्थिती ज्वारीची आहे. कणसामधील दाण्यांचे बीजांकुरण होत आहे. कणसे काळी पडली आहेत. कापसाची बोंडे सडायला लागली आहेत, तर फुटलेल्या बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झालेली आहे. कापूस सडायला लागला आहे. यामधील सरकीलाच कोंब फुटायला लागले असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात आहे.
पुणे विभागात दिड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
पुणे विभागात सध्या सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे प्रथमदर्शनी जवळपास दिड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नुकसानीचा एकदा वाढू शकेल अशी भीती पुणे विभागाचे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. आयुक्त म्हैसेकर, सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह महसूल विभागाच्या टीमने सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांच्यासोबत विमा कंपनीचे अधिकारी देखील सामील असल्याने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करीत नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश म्हैसेकर यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, कांदा, द्राक्षे आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून अशीच स्थिती सांगली जिल्ह्यात असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले. काल सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी भागाचा दौरा केल्यानंतर आज पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांच्या नुकसानीची म्हैसेकर यांनी पाहणी केली. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावून गेल्याने शेतकरी हतबल झाला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी फोटो जरी टाकले तरी त्याचे पंचनामे करण्यास सुरुवात केल्याचेही म्हैसेकर यांनी सांगितले.
अमरावती विभागात तब्बल 12 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान
अमरावती जिल्ह्यात आणि विभागात 17 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती विभागात तब्बल 12 लाख 9 हजार 158 हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे 10 लाख 86 हजार 118 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा आणि सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना 18 ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन जागेवरच भिजले आहे. बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झालेली आहे. कापूस सडायला लागला आहे. यामधील सरकीलाच कोंब फुटायला लागले असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात आहे. अमरावती विभागात एकूण 5 हजार 528 गावांना या पावसाचा फटका बसला असून 10 लाख 86 हजार 118 शेतकऱ्यांचं तब्बल 12 लाख 9 हजार 158 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
पालघर जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली असून या परतीच्या पावसामुळे भात शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी, वाडा, विक्रमगड , पालघर , मोखाडा, जव्हार या भागात रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 75 हजार हेक्टरवर असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात पिक पूर्णपणे तयार झालं असून सध्या जिल्ह्यात भात कापणीची शेतकऱ्यांनी काम सुरू केली आहेत. मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतात वाळत टाकलेला भात पाण्यात पूर्णपणे नष्ट झाले. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील बळीराजा हताश झाला आहे. तर गेल्या कित्येक दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झालं असून अजूनही काही भागात शासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असून शासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
12 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गोरख चव्हाण या शेतकऱ्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे नऊ वर्ष जगविलेल्या 12 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. टँकरनं पाणी पुरवठा करून दुष्काळात द्राक्ष बाग जगविली. मात्र, आता परतीच्या पावसानं सारच उध्वस्त झालं आहे. 20 दिवसापासून सातत्याने पाउस सुरु असल्यान द्राक्षमणी अक्षरशः कुजलेत. दिवसातून दोन तीन वेळा औषध फवारणी करूनही उपयोग होत नसल्यान बाग तोडण्याची वेळ आलीय.
हिंगोली जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस कोसळला. वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पासून झाला. परतीच्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय. हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज परभणीच्या जिंतुर तालुक्यातील येलदरी, चिंचखेडा परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली शिवाय शेतकऱ्यांनी जमा केलेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात केळणा आणि रायघोळ या दोन नद्यांना पूर आलाय. यात गजानन खराटे नावाचा व्यक्ती रायघोळ नदीच्या पूरात वाहून गेलाय. आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन अनेक गावांना याचा फटका बसला. नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)