#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | माझ्या हातात सरकारचा रिमोट नाही : शरद पवार
सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे.
मुंबई : सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे. पहिल्या सत्रात शरद पवार यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे. आधुनिक शेती आणि शेतीपुरक उद्योगांवर भर देण्याची गरज, माझा महाराष्ट्र, माझा व्हिजनमध्ये शरद पवारांची सूचना, शेतीवरचा ताण कमी करण्याचाही सल्लाही त्यांनी दिला आहे.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, साहित्य, संगीत,नाटक ह्या गोष्टीचा राज्यात प्रसार वाढला पाहिजे. सुसंस्कृत समाज असलेला महाराष्ट्र असला पाहिजे याची काळजीही घेणं आवश्यक आहे. आपण मराठीचे अभिमानी आहोत, पण अनेक ठिकाणी हिंदी भाषिकही आहेत. त्यामुळे भाषिक ऐक्य असणं गरजेचं आहे. असं ते म्हणाले. तसेच वाढत्या लोकसंख्येचा दबाव येतोय, पण लोकांचे जीवनमान उचावण्यासाठी नागरीकरणात अजून काम करणं गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, 'सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे, मला स्वतःला या सरकारबाबत कोणतीही शंका नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल'. याबाबत पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 'सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत आणि दुसऱ्यांच्या कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाहीत.'
शरद पवार म्हणाले की, 'शिवसेना म्हणून आमचा कधी संपर्क आला नाही, पण बाळासाहेब ठाकरेंसोबत मित्र म्हणून खूप संपर्क होता. त्यांनी एखादा शब्द दिला तर तो शब्द ते पाळायचे. काँग्रेसचे निर्णय दिल्लीमध्ये होतात. आज काँग्रेसने निर्णय घेण्याचा पद्धतीत बदल केला असून सहकार्य करायचे, सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसत आहे.'
जुन्या सरकाचे निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलले याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, 'जुन्या सरकारचे निर्णय बदलले, हे मान्य आहे. परंतु त्यामुळे राज्यावर विशेष परिणाम होईल, असं वाटत नाही. तसेच सरकारचा रिमोट तुमच्या हातात आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, 'या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही. एकादा उभं करून द्यायचं आणि सगळं नीट चालायला लागल्यावर मी लांब झालो. गरज पडली, मदत मागितली की मी आहे. यापेक्षा जास्त सरकारशी संबंध ठेवायचा नाही, हा निर्णय घेतला.'
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे.
संबंधित बातम्या :
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन LIVE : आधुनिक शेती आणि शेतीपुरक उद्योगांवर भर देण्याची गरज : शरद पवार