Majha Maharashtra Majha Vision | 'मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार, भाजपप्रणित संघटनांकडून मिठाचा खडा' : अशोक चव्हाण
#MajhaVision2020 : एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण प्रकरणात भाजपप्रणित काही संघटना यात मिठाचा खडा घालत आहेत, असं चव्हाण म्हणाले.
Majha Maharashtra Majha Vision 2020 : मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार केला जातोय. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारचे प्रयत्न थांबलेले नाहीत. कुणाचाही विरोध आरक्षणाला नाही. मराठा आरक्षणाची ही सगळी प्रक्रिया फडणवीसांच्या काळात झाली. आम्ही ती पुढं नेत आहोत. निष्णात वकिलांची फौज आहे. चार वेळा लेखी अर्ज आपण सर्वोच्च न्यायालयात केले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत रस्त्यावर येण्यात काही अर्थ नाही, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं.
नकारात्मक भूमिका घेण्यापेक्षा सकारात्मकपणे पुढं यावं
अशोक चव्हाण म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेत रस्त्यावर येण्यात काही अर्थ नाही. आपण न्यायालयात ही लढाई कशी लढू शकतो यावर विचार व्हावा. भाजपप्रणित काही संघटना यात मिठाचा खडा घालत आहेत. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही. नकारात्मक भूमिका घेण्यापेक्षा सकारात्मकपणे पुढं यावं. न्यायालयात काय घडणार हे माहित असेल तर तुम्ही न्यायालयात जा. तुमची भूमिका मजबूत असेल तर आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. दोघांनी मिळून प्रयत्न केले जावेत.
चव्हाण म्हणाले की, सरकार तीन ते चार महिन्यांपासून थांबलं आहे. आरक्षणाची स्थगिती उठेल यासाठी. मात्र आता हळूहळू शाळा कॉलेज सुरु होत आहेत. मुलांना सात महिन्यात संपूर्ण वर्षाचा अभ्यास करायचा आहे. वर्ष वाया जाऊ नये. ज्यांना एसईबीसीत अॅडमिशन मिळणार नाही त्यांना खुल्या प्रवर्गात अॅडमिशन घेता येतं, तेवढ्या जागा आहेत आपल्याकडं. त्यांना अॅडमिशन मिळणार नाही असं नाही, हाच अपप्रचार आहे. कुणाचंही नुकसान होणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण म्हणाले की, जिथे कोर्टाची एसईबीसीला स्थगिती आहे तिथं काय पर्याय आहेत, हे मला सांगा. मी मंगळवार किंवा बुधवारी खासदार संभाजीराजेंना भेटणार आहे. काही सूचना असेल तर नक्की द्या. स्थगिती उठेल अशी अपेक्षा होती मात्र चार वेळा अर्ज करुनही कोर्ट ऐकत नाही. मुख्य न्यायाधीशांना चार वेळा अर्ज केला. निर्णय त्यांना घ्यायचा आहे. याशिवाय काही पर्याय असेल तर सुचवा तोही आम्ही स्वीकारु, असं देखील अशोक चव्हाण म्हणाले.
ते म्हणाले की, आरक्षणाचं मातेरं सरकारनं केलं आहे का? हा निर्णय कोर्टानं घेतला आहे. सरकारची बाजू सर्वांना माहिती आहे. यात मग सरकार दोषी कसं? यात राजकारण केलं जात आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेसमुळं हे सरकार आहे हे नाकारता येणार नाही अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसमुळं हे सरकार आहे हे नाकारता येणार नाही. तिन्ही पक्षांमुळं सरकार आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल. टिकलं पाहिजे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो. चांगलं काम करु, असं ते म्हणाले. ते पुढं म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. फडणवीस सरकारच्या काळात वीज बिलाची थकबाकी 60 हजार कोटींच्या जवळ गेली. सरकारनं वीजबिलाबाबत जो काही निर्णय घ्यायचाय तो समन्वयानं घ्यावा. आम्हाला काही आक्षेप नाही. बावनकुळेंच्या काळातली प्रगती सर्वांसमोर आहे. वीजबिलाच्या मुद्द्यात कुठलाही श्रेयवाद नाही. यात कुणाचा व्यक्तिगत श्रेय नाही किंवा विरोध नाही, असं ते म्हणाले.
महाविकास आघाडीत सरकारमध्ये कुरबुर नाही
सरकारमधील कुरबुरीच्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीत सरकारमध्ये कुरबुर नाही. चार भिंतीच्या आत चर्चेने प्रश्न सुटतात. आम्ही चांगल्या वातावरणात काम करतो. समन्वय उत्तम आहे. प्रश्न निर्माण झाला तर मुख्यमंत्र्यांसोबत बसून प्रश्न सोडवतो. भाजपला काहीतरी टीका करायची असते, भ्रम निर्माण करायचे असतात. सरकार अस्थिर असल्याचे दाखवायचं आहे. मात्र सरकार स्थिर आहे. लावालावी करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी सरकार पाच वर्ष उत्तम पद्धतीनं काम करणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
ते म्हणाले की, कोरोनामुळं खूप नुकसान झालं. मी कोरोनाला संधी म्हणून पाहतो. राज्यातल्या आरोग्य सेवा बळकट झाल्या. आरोग्य सेवेतील उणीवा कमी करुन बळकटी दिली. आलेला 70 टक्के पैसा हा आरोग्य क्षेत्रावर खर्च झाला. राज्यभर कोरोनावर मात करण्यासाठी एक मोठी फौज उभारता आली, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
वीजबिल माफीचं काय? 'राज्याचे पैसे केंद्रानं अडवले!', आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने